
नेहमीच दुर्लक्षित असलेल्या सीएसएमटी ते वाशी-पनवेल हार्बर मार्गावर प्रथमच गारेगार एसी लोकलच्या 12 फेऱया धावणार आहेत. या फेऱया सध्याच्या साध्या लोकलच्या बदल्यात चालविण्यात येणार आहेत. तर सीएसएमटी ते अंधेरी फेऱया आणि पनवेल ते अंधेरी सर्व फेऱया गोरेगाव स्थानकांपर्यंत चालविण्यात येणार आहेत. येत्या 1 डिसेंबरपासून नव्या वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर-नेरूळ-खारकोपर मार्गाचे सुधारित वेळापत्रक 1 डिसेंबरपासून लागू होत आहे. या नव्या वेळापत्रकानुसार हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी-पनवेलदरम्यान दिवसभरात 12 एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. यातील एक फेरी वाशी ते सीएसएमटी आणि 11 फेऱया सीएसएमटी ते पनवेल चालविण्यात येणार आहेत. साध्या लोकलच्या बदल्यात या 12 फेऱया चालविण्यात येणार आहेत. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी मात्र एसी लोकलऐवजी साधी लोकल चालविण्यात येईल. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण) एसी लोकलच्या 10 आणि ट्रान्सहार्बरवर (ठाणे ते वाशी-पनवेल) एसी लोकलच्या 16 फेऱया चालविण्यात येत आहेत.
हार्बर मार्गावरील एकूण फेऱयांची संख्या 614 आणि ट्रान्सहार्बर लाइनवर 262 राहतील आणि मध्य रेल्वेच्या रोजच्या फेऱयांची एकूण संख्या 1774 राहील. चौथ्या कॉरिडॉरवरील सकाळच्या पिक अवर्सच्या वेळेत फेऱया वाढतील. तथापि एकूण फेऱयांची संख्या 40 इतकीच राहील. मानखुर्दवरून सुटणारी लोकल आता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. ठाणे येथून स. 10.40 वाजता सुटणारी बेलापूर लोकल आणि ठाणे येथून रा. 11.14 वाजता सुटणारी बेलापूर लोकल आता पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहे.
हार्बरवरील एसी लोकलचे वेळापत्रक
वाशी येथून पहाटे. 4.25 वा., सीएसएमटी पहाटे 5.18 वा., पनवेल स. 6.45 वा., सीएसएमटी स. 8.08 वा., पनवेल स. 9.40 वा., सीएसएमटी स. 11.04 वा., पनवेल
दु. 12.41 वा., सीएसएमटी दु. 2.12 वा., पनवेल दु. 3.45 वा., सीएसएमटी सायं. 5.08 वा., पनवेल सायं. 6.37 वा., सीएसएमटी रा. 8 वा.
n छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरी आणि पनवेल-अंधेरीपर्यंतच्या सर्व फेऱयांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अंधेरीदरम्यान चालणाऱया 44 फेऱया गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील.
n सध्याच्या पनवेल आणि अंधेरीदरम्यान धावणाऱया 18 फेऱयांचा गोरेगावपर्यंत विस्तार केला जाईल. वांद्रेपर्यंत धावणाऱया 2 फेऱया गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील. गोरेगावपर्यंत एकूण फेऱयांची संख्या 42 वरून 106 पर्यंत वाढेल.
































































