चिंचपोकळीकरांना मिळाली किलबिल नर्सरीची नवी वास्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिंचपोकळीकरांना किलबिल नर्सरीची नूतन वास्तू मिळाली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचालित या नर्सरीच्या वास्तूचे नूतनीकरण शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या सहकार्याने झाले. त्याबद्दल विभागातील नागरिकांच्या वतीने खासदार देसाई यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या किलबिल नर्सरीचे नूतनीकरण व्हावे अशी विभागातील जनतेची इच्छा होती. खासदार अनिल देसाई यांच्यामुळे ती पूर्ण झाली. या नूतन वास्तूचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नगरसेवक रमाकांत रहाटे, अनिल कोकिळ, सिंधू मसुरकर यांच्यासह सुनील (बाळा) कदम, विधानसभा संघटक विजय लिपारे, न्यू इंडिया अॅश्युरन्स स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, शाखाप्रमुख हेमंत कदम, लोकाधिकार महासंघाचे चिटणीस वामन भोसले, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, शेखर पांडे, शाखा संघटक भारती पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त रोप मल्लखांबपटू हिमानी परब हिचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.