
महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत सातारा तालुक्यातील शेंद्रे गावच्या हद्दीतील सेवारस्त्यावर पकडला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून आरएमडी पान मसाला, विमल पानमसाला व व्ही 1 टोबॅको हा प्रतिबंधित माल व 2 वाहने असा एकूण 20 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रविवारी (दि. 28) सातारा तालुक्यातील शेंद्रे गावच्या हद्दीत साताराकडे येणाऱया सेवा रस्त्यावर दोघेजण त्यांच्या टेम्पोमधून महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास बंदी असलेला गुटखा कर्नाटक राज्यातून घेऊन येणार असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथक तेथे सापळा लावून थांबले असताना, संबंधित टेम्पो आला. त्यातील दोन इसम टेम्पोमधून आणलेली गुटख्याची पोती व बॉक्स सातारा येथील किकत घेणाऱया पार्टीच्या कारमध्ये ठेवत असताना मिळून आले. पथकाने टेम्पोमधील दोन व कारमधील एक अशा तीन इसमांना दोन वाहनांसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आरएमडी पान मसाला, विमल पानमसाला व व्ही 1 टोबॅको वगैरे असा 8 लाख 92 हजार 800 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल व 2 वाहने असा एकूण 20 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, विकास सोनावणे यांना कळविल्यानंतर त्यांनी समक्ष हजर होऊन ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून, त्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, पोलीस नाईक नीलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, शिवाजी भिसे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल रोहित निकम, स्वप्नील माने, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव यांनी ही कारवाई केली.






























































