लढाऊ विमान मिराजच्या टायर्सची चोरी, लखनौमधील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mirage-aircrafts-attacked

हिंदुस्थानी हवाई दलात लढाऊ विमानाच्या टायर्सची चोरी झाल्याचं वृत्त आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनौमधील शहीद पथावर घडली आहे. ही माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

मिराज विमानाचे टायर्स एका ट्रेलरवरून नेण्यात येत होते. लखनौच्या बीकेटी येथे मध्य वायू कमानचा तळ आहे. तिथून ते जोधपूर येथे पाठवण्यात येत होते. 27 नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजता हा ट्रेलर टायर्ससहित निघाला होता. या ट्रेलरचा चालक अजमेर इथला रहिवासी असलेला हेम सिंह रावत होता.

लखनौच्या शहीद पथवरून कानपूरच्या दिशेने ट्रेलर जात असताना एसआर हॉटेलनजीक वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे ट्रेलर थांबवावा लागला. ट्रेलरच्या मागे असलेल्या एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून दोन जण उतरले. त्यांनी ट्रेलरवरचे दोरखंड कापले आणि एक टायर चोरला. वाहनांची गर्दी असल्याने ही चोरी लगेच कळून आली नाही. त्याचा फायदा उचलत स्कॉर्पिओ तिथून निघून गेली.

या चोरीची सूचना हेम सिंह यानेच पोलिसांना दिली. या प्रकरणी हेम सिंह याला हवाई दलाने ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीसही प्रयत्न करत आहेत.