
देश विदेशातील पर्यटक वाघ बघण्यासाठी ताडोबा अभयारण्याला भेट देत असतात. दरवर्षी पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. ताडोबातील वाघांनी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख सातासमुद्रापार नेली, मात्र आता जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठल्याने चिंता व्यक्त केली जात. ताडोबातील कोलारा क्षेत्रात वनरक्षक स्वाती ढूमणे यांचा वाघाच्या हल्यात दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने वनकर्मचाऱ्यांचा सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या जिप्सीच्या मागे वाघ धावल्याची घटना नुकतीच घडली होती. सध्या ताडोबात बफर आणि कोअरच्या वेगवेगळ्या गेटच्या माध्यमातून जवळपास 100 च्या वर जिप्सी जंगलात आतमध्ये प्रवेश करत आहे. ओपन जिप्सीची उंची कमी असल्याने कधीही अनुचित घटना घडू शकते. अश्या घटना टाळण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने आता नवे पाऊल उचलले. खुल्या जिप्सीला पर्याय शोधण्यासाठी व्यवस्थापनाने पॅकबंद जिप्सीची संकल्पना पुढे ठेवली आहे. यासाठी डिजाईन प्रतियोगीता आयोजित केली आहे. उत्कृष्ट डिझाईनला 25 हजाराचे पारितोषिक दिल्या जाणार आहे. मात्र हा निर्णय कदाचित स्थानिक युवकांच्या रोजगाराला मारक तर ठरणार नाही ? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. तर हा निर्णय मोठ्या रिसॉर्ट चालकांना फायदा पोहचविणारा असल्याचा सूरही बघायला मिळत आहे.


































































