पुस्तकवाले तुमच्या दारी! वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पुण्यातील दाम्पत्याने सुरू केले मोबाईल बुक स्टोअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही’, असे म्हटले जाते, मात्र हल्लीच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकांनी वाचनाकडे पाठ फिरवली आहे. वाचन संस्कृती रुजावी यासाठी पुण्यातील आशय वाळंबे आणि ऋतिका वाळंबे या दांपत्याने अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी ‘पुस्तकवाले’ या नावाने मोबाईल बुक स्टोअर सुरू केले आहे. त्याअंतर्गत गेल्या दीड वर्षात त्यांनी पुणे आणि परिसरातील 300 सोसायटय़ांमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवले असून 15 हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री केली आहे.

‘पुस्तकवाले’चा सर्वेसर्वा आशय वाळंबे हा पेशाने इंजिनीअर असून त्याने एमबीएदेखील पूर्ण केले आहे. या भन्नाट उपक्रमाच्या संकल्पनेबाबत तो म्हणाला, पुण्यातील बऱयाचशा भागांमध्ये पुस्तकांची दुकाने नाहीत हे लॉकडाऊनमध्ये आमच्या लक्षात आले. लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे सोसायटय़ांमध्ये फळे, भाज्या, किराणा मालाची विक्री केली जात होती मग सोसाटय़ांमध्ये जाऊन पुस्तकांची विक्री का करू नये, असा विचार आमच्या मनात डोकावला. या काळात बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ मंडळींना फारसे घराबाहेर पडणे शक्य नव्हते. त्यांच्यापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी 1 ऑगस्ट 2020 रोजी आम्ही या उपक्रमाला सुरुवात
केली.

सिनेमा पाहण्यासाठी किंवा हॉटेलात जेवणासाठी कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र घराबाहेर पडतात, परंतु सहकुटुंब ग्रंथालयाला कुणी भेट दिल्याचे फारसे ऐकायला मिळत नाही. मोबाईल व्हॅनमुळे ग्रंथालयच सोसायटीमध्ये आल्यामुळे दिवसभरात घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या वेळेनुसार स्टॉलला भेट देते असेही तो म्हणाला.

तीन हजार  पुस्तकांचा खजिना 

पुणे आणि परिसरातील सोसायटय़ांमध्ये जाऊन आम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे प्रदर्शन भरवतो. सर्वच वयोगटासाठी जवळपास तीन हजार पुस्तके आमच्या मोबाईल व्हॅनमध्ये असतात. सुरुवातीला आम्ही केवळ वीकेंडला पुस्तक प्रदर्शन भरवायचो. आता प्रकाशक आणि वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मंगळवार ते रविवारदरम्यान भरवले जाते. अधिकाधिक वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचविण्यासाठी आमची 50 जणांची टीम असून त्यातील बहुतेक जण 18 ते 22 वयोगटातील आहेत. सुधा मूर्ती, कवी गुलजार या दिग्गजांनीदेखील उपक्रमाचे कौतुक केल्याचे आशयने सांगितले.