
रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हाही दाखल असून, त्यात जामीन मिळण्यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. .न्यायालयाने याबाबत म्हणणे मांडण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. सोमवारी (दि. 6) यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार असून, सोमवारी होणाऱया सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यात येणार असल्याचे फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी सांगितले.
जरे यांच्या खुनाच्या घटनेनंतर एकीकडे पोलीस फरार असलेला आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असताना, त्याच्याविरुद्ध विवाहितेचा विनयभंग व खंडणी असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. जरे यांच्या खुनाच्या गुह्याच्या तपासासह या अन्य दोन गुह्यांचाही तपास पोलिसांनी केला आहे. या तिन्ही गुह्यांत आधी पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी बोठेला मिळाली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जरे खून प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज फेटाळला गेल्याने या निर्णयाला त्याने संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. त्यावर 15 रोजी सुनावणी होणार आहे. याच वेळी त्याने त्याच्याविरुद्धचा खंडणीचा गुन्हा रद्द व्हावा म्हणूनही संभाजीनगर खंडपीठात स्वतंत्र याचिका केली असून, त्याची सुनावणी प्रलंबित आहे.
दरम्यान, विनयभंगाच्या गुह्यात जामीन मिळण्यासाठी बोठेने नगर जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर सुनावणी होऊन पोलिसांना म्हणणे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याची शुक्रवारी (दि. 3) सुनावणी होती; पण पोलिसांनी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे यावरील सुनावणी आता सोमवारी (दि. 6) होणार आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने हस्तक्षेप अर्ज करण्यात येणार असून, तो सोमवारच्या सुनावणीत दाखल करून त्याच वेळी फिर्यादीचे म्हणणेही मांडले जाणार असल्याचे ऍड. पटेकर यांनी सांगितले.


























































