
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) 2022 साठी मेगा ऑक्शन लवकरच होणार आहे. दोन नव्या संघामुळे आयपीएलचा हा सिजन चुरशीचा होणार आहे. या सिजनमध्ये प्रत्येक संघ नव्याने बनवला जाणार आहे. त्यामुळे युवा खेळाडू, अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंच खेळात चमक दाखवलेले खेळाडू यांना यावेळी चांगलीच मागणी असेल. सर्व फ्रेंचायची या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खेळाडू आकाश चोपडा यांनी 6 अशा अनकॅप्ड खेळाडूंची नावे सांगितली आहेत, ज्यांच्यावर फ्रेंचायजी मोठ्या बोली लावण्याची शक्यता आहे. या सहा खेळाडूंमध्ये शाहरुख खान, रवी बिश्नोई, आवेश खान, राहुल त्रिपाठी, शिवम मावी आणि कार्तिक त्यागी यांचा समावेश आहे, असे आकाश यांनी सांगितले.
शाहरुख खान या आधीच्या सिजनमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता. या अष्टपैलू खेळाडूमध्ये लांब अंतारवर सिक्सर टोलवण्याची क्षमता आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 11 सामने खेळले असून त्यात 21.85 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये 47 धावा हा त्याचा बेस्ट स्कोर आहे.
रवि बिश्नोई या खेळाडूने गोलंदाजीत दाखवलेल्या कामगिरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पंजाब किंग्ज संघात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी त्याने स्वतः रिटेन होण्यास नकार दिला आहे. या लेग स्पिनरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 23 सामने खोळले असून 24.91 च्या सरासरीने 24 गडी बाद केले आहेत. 24 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद करण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आवेश खान हा जलदगती गोलंदाज दिल्ली कॅपिटलकडून सिजनमध्ये मैदानात उतरला होता. 2021 च्या सिजनमध्ये 24 पेक्षा जास्त गडी बाद करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. मात्र, यावेळी त्याला दिल्ली संघाने रिटेन केले नाही. त्यामुळे या ऑक्शनमध्ये या खेळाडूवर चांगली बोल लागण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत 25 सामने खोळले असून 29 गडी बाद केले आहेत.
राहुल त्रिपाठी हा धडाकेबाज फलंदाज असल्याचे आकाश चोपडा यांनी सांगितले. तो सलामीलाही उतरू शकतो. तसेच मधल्या फळीत खेळण्याचीही त्याची क्षमता आहे. त्याची कामगिरी पाहता त्याच्यावर शाहरुख खानपेक्षा जास्त बोली लागण्याची शक्यता आकाश यांनी वर्तवली आहे. राहुल याआधीच्या सिजनमध्ये कोलकात नाईट रायडरकडून खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये 62 सामने खेळले असून 26.13 च्या सरासरीने 1385 धावा केल्या आहेत. त्यामुळे या ऑक्शनमध्ये त्याच्याकडेही फ्रेंचायजींचे लक्ष असणार आहे.
शिवम मावी हा जलदगती गोलंदाज असून तो अषिटपैलू आहे. नव्या चेंडून गोलंदाजी करण्याची आणि तडाखेबंद फलंदाजी करण्याची क्षमता शिवममध्ये आहे. तो आतापर्यंत कोलकात नाइट रायडर्स संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 26 सामने खोळले असून 25 गडी बाद केले आहेत. त्यामुळे शिवमवरही मोठी बोली लागण्याची शक्यता आकाश यांनी वर्तवली आहे.
कार्तिक त्यागी हा खेळाडू जखमी झाल्याने फारशी चमक दाखवू शकलेला नाही. जखमी झाल्याने त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, यॉर्कर आणि बाउंसर टाकण्याची त्याची विशेष शैली आहे.जखमी झाल्याने त्याला टिम इंडियात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आयपीएलमध्ये 14 सामने खेळले असून त्यात 13 गडी बाद केले आहे. त्यामुळे ऑक्शनमध्ये हा खेळाडूला चांगली संधी असल्याचे आकाश यांनी सांगितले.





























































