
सध्या मनोरंजनाऐवजी ‘नमोरंजन’च जास्त होत आहे, अशा कानपिचक्या माध्यम तज्ञ जयदेव डोळे यांनी दिल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
आजकाल विचारशक्तीला उपद्रवशक्ती मानले जाते. राजसत्ता सर्व काबीज करण्यास पाहत आहे. लोकांनी विचार करायचा नाही, फक्त करमणूक करून घ्यावी, असे चित्र उभे केले जात आहे. यात अभिव्यक्ती हरवत असल्याची खंत डोळे यांनी व्यक्त केली. तसेच लोकशाहीला मनोरंजक रूप देण्याचे काम सुरू असून भाकरी की स्वातंत्र्य असा प्रश्न केला जातो. फक्त कर्तव्य करत राहा, हक्क व अधिकार यांचा विचार करू नका. पत्रकारितेचा धर्म सत्याकडे जाणारा आहे. म्हणून त्याला इझम जोडला आहे. आज पत्रकारिता धर्म विसरली असल्याचे सांगत पत्रकारांनी सामाजिक जागृतीचे भान राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
बातमीची मांडणी बदलण्याची गरज
पत्रकारांनी बातमीची मांडणी बदलण्याची आता गरज आहे. फक्त बातमी न देता तिच्या आजुबाजूला काय आहे याचा विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी केले. आपल्याला प्रगल्भतेची आस आहे का, याचा प्रत्येकाने विचार करावा. ती नसेल तर ती तयार करण्याचे महत्त्वाचे काम माध्यमांनी केले पाहिजे. सीएनएन पत्रकारांनी ट्रम्प यांना अमेरिकेची प्रतिमा सांभाळणे हे आमचे काम नाही असे ठणकावून सांगितल्याचे म्हणत या पातळीवरचा विचार आपल्या देशातील मीडियाने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
टीआरपीच्या नादात निबृद्ध मनोरंजनाकडे वळतोय का
एज्युकेट, अवेअर, ऑरगनाईज, इनफॉर्म व एन्टरटेन या बातमीच्या कामांपैकी आता फक्त पहिल्या पाचही सूत्रांवर मनोरंजनच दिसत असल्याचे प्रतिपादन प्रा. हरि नरके यांनी केले. टीआरपीच्या स्पर्धेत रेव्हेन्यू ओढून आणण्यामागे आपण निबृद्ध मनोरंजनाकडे वळतोय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ट्रोलिंगला प्रेक्षक कंटाळले
अपर्णा वेलणकर म्हणाल्या, सततच्या ट्रोलिंगला दर्शक कंटाळले आहेत. बदलाची ही प्रक्रिया चालू झाली आहे. यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रत्येकजण स्पेस विसरून गेल्यासारखे वागतोय ही अडचण आहे. ज्यांना गंभीर विषयात रस आहे असे कायमच अल्पसंख्य असतात, पण सगळं संपलंय, असं म्हणून श्राद्ध घालायची गरज नसल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्य मीडियावर सोशल मीडियाचे दडपण
जागतिकीकरणाला विरोध करण्याचे दिवस आता गेले आहेत. जागतिकीकरणाचा अतिरेक सर्वत्र पाहावयास मिळतोय. मीडिया हा त्याचाच आरसा आहे. पण शेवटी हाही व्यवसाय आहे हे आपण विसरता कामा नये. व्यवसायात मागणीप्रमाणे पुरवठा करावा लागतो तसेच हे आहे. मुख्य मीडियावर सोशल मीडियाचे दडपण असल्याने काही गोष्टी अतिरंजीत करून दाखवल्या जात असल्याचे प्रतिपादन विश्वंभर चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले. मनोरंजन वाईट नाही, पण त्याचे स्वरूप बदलले असल्याचे त्यांनी सांगितले.

























































