
मुंबईच्या महापौरांबद्दल अपशब्द वापरणारे भाजपाचे आमदार अँड.आशीष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात शेलार यांना गुरुवारी पोलीस ठाण्यात एक लाखाच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजुर करण्यात आला.
आशिष शेलार यांनी 4 डिसेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौरांबद्दल अपशब्द उच्चारले होते. महापौरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शेलारांचा निषेध करीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी जोरदार मागणी शिवसेना महिला आघाडीकडून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली होती.. शिवाय शेलार यांना अटक करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल उत्तर देण्याचा इशाराही शिवसेना महिला आघाडीकडून देण्यात आला होता. दरम्यान, महापौरांचा जबाब नोंदवल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेलार गुरुवारी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात हजर झाले असता त्यांना एक लाखाचा नियमित जामीन मंजूर करण्यात आला.
शेलारांची हायकोर्टात धाव
वरळी सिलिंडर स्फोट प्रकरणावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरणारे भाजपचे आमदार ऍड. आशीष शेलार चांगलेच गोत्यात आले आहेत. शेलार यांच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा गुन्हा रद्द करण्यासाठी शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेलार यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.





























































