जगाची नजर क्वांटम कॉम्प्युटरवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘क्वांटम कॉम्प्युटर्स’ हे शब्द गेला काही काळ बऱ्याचदा आपल्या वाचनात आले असतील, आपल्या कानावरदेखील पडले असतील. उत्सुकता वाढवणाऱ्या या शब्दांत नक्की दडले तरी काय आहे? सध्या जगातील सर्वच देश या तंत्रज्ञानाच्या मागे वेगाने धावत आहेत आणि जगभरातील तज्ञदेखील या तंत्रज्ञानाला ‘जगाचे भविष्य’ म्हणून सांगत आहेत.

हिंदुस्थान सरकारने गेल्या वर्षी ‘क्वांटम संगणक’ तंत्रज्ञानातील विकास साधण्यासाठी तब्बल 8 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षीदेखील हिंदुस्थान सरकारने ‘क्वांटम सिम्युलेटर क्युसिम’ योजना सुरू केली आहे, त्यामुळे वैज्ञानिकांबरोबरच खासगी उद्योजकांनादेखील या क्षेत्रात काम करणे सुलभ होणार आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेने 2018 साली चक्क ‘नॅशनल क्वांटम इनिशिएटिव्ह’ हा कायदा तयार केला असून या तंत्रज्ञानासाठी 1.2 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. चीन सरकारने तर 2016 वर्षात या तंत्रज्ञानाला महत्त्वाच्या उद्योगाचा दर्जा बहाल केला आहे.

ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट ही मूलभूत अणुरेणूंपासून बनली आहे हे साधारण एकोणिसाव्या शतकापासून संशोधकांच्या लक्षात येऊ लागले. मात्र पुढे जाता अणूचेदेखील विभाजन झाले आणि इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची जगाला नव्याने ओळख झाली. जगभरात सर्वात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या एका शोधांपैकी असलेला एक म्हणजे ‘गुरुत्वाकर्षणाचा शोध’ होय. मात्र न्यूटनच्या या गुरुत्वाकर्षणाचे नियम काही गोष्टींना लागू होत नाहीत हेदेखील या शतकाच्या अंताला संशोधकांच्या लक्षात येऊ लागले. प्रचंड गती असणारे आणि अत्यंत सूक्ष्म असे पदार्थ वेगळेच नियम पाळतात हे सिद्ध झाले. त्यातच 1899 साली जर्मन शास्त्रज्ञ मॅक्स प्लॅंक याने बॉडी रेडिएशनचा अभ्यास करताना ‘ऊर्जा ही लहान लहान भागात म्हणजे क्वांटममध्ये प्रसारित होते’ हा सिद्धांत मांडला. याच मॅक्सला पुढे जाऊन ‘क्वांटम तंत्रज्ञानाचा जन्मदाता’ मानले गेले. या अतिसूक्ष्म अणुरेणूंनी सृष्टीचे सर्व नियमच जणू धाब्यावर बसवले आहेत. हे तंत्रज्ञान समजणे इतके अवघड आहे की, खुद्द ‘क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स’मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन म्हणतात की, जर कोणाला असे वाटत असेल की, त्याला क्वांटम फिजिक्स समजले आहे, तर नक्की समजा की, त्याला काहीही समजलेले नाही. अत्यंत साध्या भाषेत समजवायचे तर संगणकाचे पूर्ण जग हे 0 आणि 1 या दोन क्युबिटवर उभे आहे. मात्र क्वांटम तंत्रज्ञान हे 0 आणि 1 किंवा फक्त 0 आणि फक्त 1 किंवा 0 आणि 1 अशा अनेक अनिश्चित क्युबिटवर उभे राहणारे आहे.
भविष्यात हे तंत्रज्ञान अंतराळ संशोधन, पदार्थ विज्ञान, औषध निर्मिती, ई कॉमर्स, जीपीएस, दळणवळण, विविध स्मार्ट उत्पादने बनवणे अशा अनेक क्षेत्रांत उपयोगी पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुख्य म्हणजे ‘कोरोना’सारख्या वेगाने पसरणाऱया विषाणूचा अभ्यास करण्यासाठी, हवामानाच्या बदलांचा अचूक अभ्यास करण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरेल असे मानले जात आहे.

[email protected]