
प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आता मृतदेहांचे दहन पर्यावरणपूरक विटांनी केले जाणार आहे. शेतातील टाकाऊ मालापासून या विटा बनवलेल्या असतील. यामुळे टाकाऊ शेतमालाचाही योग्य रीतीने पुनर्वापर होणार आहे. पालिकेच्या 14 स्मशानभूमींमध्ये या विटा वापरण्यात येतील. यामुळे हजारो झाडेही वाचतील.
मुंबईत पालिकेच्या देखरेखीखाली चालणाऱ्या 54 आणि खासगी संस्थांमार्फत देखरेख केली जाणाऱ्या 121 स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये मृतदेहांच्या दहनासाठी मोफत सरण पुरवले जाते. दोन वर्षांसाठी पालिकेने दीड कोटी टन सरण विकत घेण्याचा करार केला असून त्यासाठी 37 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र आता पालिका सरण म्हणून लाकडासोबत शेतातील टाकाऊ मालापासून बनविण्यात आलेल्या जळाऊ विटा वापरणार आहे. मुंबईतील सर्व स्मशानभूमीत या विटांचा वापर झाल्यास तब्बल 90 हजार झाडांचा बळी जाणार नाही. पालिकेने या 14 स्मशानभूमींची यासाठी निवड केली आहे, त्या स्मशानभूमीत वर्षाला 8 हजार 282 मृतदेहांचे दहन होते.





























































