
गेल्या 14-15 वर्षांपासून पारनेर तालुक्याच्या विविध भागांमध्ये बिबटय़ाचे कधीतरी दर्शन होत असे. आता बिबटय़ांची संख्या कमालीची वाढल्याचे चित्र असून, बिबटय़ांचा रात्री नव्हे, तर दिवसाढवळया मुक्त संचार वाढल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील रेणवडी येथे ट्रक्टरवरून जाणाऱया शेतकऱयाच्या दिशेने बिबटय़ा धावल्याचे व त्यानंतर तो उसाच्या शेतामध्ये पसार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जुन्नरच्या जंगलांमधून बिबटय़ांचा पारनेरच्या डोंगर-दऱयांमध्ये आश्रयासाठी, तसेच भक्ष्याच्या शोधासाठी गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वावर वाढल्याचे दिसून येते. उसाच्या शेतांमध्ये बिबटे आश्रय घेत असून, तेथेच मादी बिबटय़ांनी पिलांना जन्म दिल्याच्याही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडणारे बिबटे गेल्या काही दिवसांत दिवसाढवळ्या शेतांमध्ये मुक्त संचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत.
पारनेर तालुक्यातील रेणवडी येथे कौठमळ्यात शेतकरी संतोष गोरख भोर हे शेतामध्ये ट्रक्टर घेऊन निघाले असता, शेजारच्या शेतामधून बिबटय़ा ट्रक्टरच्या दिशेने धावून आला. ट्रक्टरचा मोठा आवाज ऐकून बिबटय़ा मागे फिरला व उसाच्या फडामध्ये पसार झाला.
संगमनेरात बिबटय़ा जेरबंद
संगमनेर तालुक्यातील चिखली शिवारात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व पशुपालकांना उपद्रव करणारा बिबटय़ा वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात आज पहाटे जेरंबद झाला आहे. चिखलीत पाळीव कुत्रे, कोंबडय़ा, लहान-मोठी जनावरे बिबटय़ाचे भक्ष्य ठरत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. दोन दिवसांपूर्वी वनपाल सोपान ढवळे व वनरक्षक जे. ए. पवळे यांनी चिखली शिवारातील संजय काजळे यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावून त्यात आमिष म्हणून कोंबडय़ा ठेवल्या होत्या. आज पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ फिरणारा बिबटय़ा वन विभागाच्या पिंजऱयात अलगद सापडला. सुमारे पाच वर्षे वयाच्या या नर बिबटय़ाची रवानगी निंबाळे रोपवाटिकेत करण्यात आली आहे.
श्रीरामपुरात कुत्र्याचा फडशा
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाऊंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून लगतच राहणाऱया प्रतापराव पटारे यांच्या शेतापर्यंत ओढत नेले. दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरातवस्ती येथे विलास नानासाहेब थोरात यांना रात्रीच्या सुमारास घरामागील द्राक्षबागेत बिबटय़ा दृष्टिपथास पडला होता. उक्कलगाव-खंडाळा रोडवरही काहींना दोन दिवसांपूर्वी बिबटय़ाने दर्शन दिले. त्यामुळे बिबटे संख्येने अधिक असण्याची शक्यता आहे.


























































