
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी श्री काशी विश्वनाथ धामचे (कॉरिडॉर) लोकार्पण केले. या कॉरिडॉरचे पहिल्या टप्प्यातील काम 2 वर्षे 9 महिन्यांत पूर्ण झाले असून त्यासाठी 339 कोटी रुपये खर्च आला आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघही आहे. दोन दिवसांच्या वाराणसी दौऱयावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी दुपारी एकच्या सुमारास श्री काशी विश्वनाथांची पूजा केली.
तत्पूर्वी गंगास्नान केले. श्री काळभैरवाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. काशी विश्वनाथांच्या पूजेनंतर पंतप्रधानांच्या हस्ते कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. हर हर महादेव म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरुवात केली. पवित्र गंगा नदीच्या काठावर हिंदुस्थानची भव्य संस्कृती वसली आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसर पूर्वी छोटा 3 हजार चौरस फूट एवढाच होता. पण आता कॉरिडॉरमुळे हा परिसर पाच लाख चौरस फूट झाला आहे. त्यामुळे 50 हजार ते 75 हजार भाविकांना गंगास्नान करून काशी विश्वनाथांचे दर्शन घेता येणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर योद्धय़ांची ही भूमी
जुलमी औरंगजेबसारख्यांनी संस्कृतीवर आक्रमणे केली. मंदिरांचे नुकसान केले. तलवारीच्या बळावर हिंदुस्थानी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला. पण औरंगजेबासारख्याचे मनसुबे उधळून लावले गेले. कारण हिंदुस्थानची भूमी जगापेक्षा वेगळी आहे. याच महान भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूर, पराक्रमी योद्धे, महान राजे निर्माण झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले.



























































