संगमनेर – कत्तलखान्यावर छापा, दीड हजार किलो गोमांस जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक छायाचित्र

संगमनेर येथील कत्तलखान्यांवर आज पोलिसांनी पुन्हा छापा मारला असून, दीड हजार किलो गोवंश मांस जप्त केले आहे. तिघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक केली असून, एक आरोपी पसार आहे.

अफसर उमर कुरेशी (वय 34, रा. भारतनगर), अनिस गुलामहैदर कुरेशी (वय 22, रा. मदिनानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अब्दुलसमद जावेद कुरेशी हा फरार आहे. कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी फिर्याद दिली आहे.

संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यामधून गोवंश होत असल्याचे पुन्हा उघड झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आज पहाटे भारतनगरमधील कत्तलखान्यांमध्ये गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यांनी पथकासह अफसर कुरेशी याच्या वाडय़ावर छापा घातला. यावेळी दोघांना पकडण्यात आले, तर एकजण पसार झाला.

यावेळी पोलिसांनी सुमारे 1500 किलो गोमांस जप्त केले. हे मांस जमिनीत खोलवर गाडून त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

जागा बदलून कत्तलखाने सुरूच

संगमनेरातील याच भागात 2 ऑक्टोबर रोजी नगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 31 हजार किलो गोवंश मांसासह 71 जिवंत जनावरे आढळली होती. तेव्हापासून पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवल्याने व त्यातच त्या कारवाईत गजाआड गेलेल्या आरोपींना अद्यापि जामीन मिळालेला नसल्याने ते कत्तलखाने बंद असल्याचे दिसत होते. मात्र, आज पहाटे पडलेल्या छाप्यातून याच परिसरातील काही कत्तलखान्यांच्या चालकांनी चालक, जागा आणि वेळा बदलून पुन्हा एकदा आपले उद्योग सुरू केले आहेत.