विचित्र दुर्घटना! झोपेत असताना वरच्या बर्थवरून पडल्याने वृद्धाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब पल्ल्याच्या ट्रेन प्रवासात वयोवृद्ध व्यक्तींना झोपण्यासाठी खालचे बर्थ दिले जातात. जेणेकरून त्यांना कमीत कमी त्रासात प्रवास करता यावा. पण, उंचावरच्या बर्थवर झोपलेल्या एका वृद्ध माणसाचा खाली पडून मृत्यू झाला आहे.

ही घटना चेन्नईमध्ये घडली आहे. मृत व्यक्तिचं नाव नारायणन कराईकुडी (72) असं आहे. एका 20 जणांच्या गटासोबत नारायणन हे सिलांबू एक्सप्रेसने सेनगोट्टाई ते चेन्नई इगमोर या दरम्यान प्रवास करत होते. रविवारी रात्रीच्या जेवणानंतर नारायणन यांनी सगळ्यात वरच्या बर्थवर झोपायचं ठरवलं.

ते वर जाऊन झोपले आणि त्यांना गाढ झोप लागली. पण, झोपेतच ते वरच्या बर्थवरून खाली कोसळले. पण, ट्रेनच्या वेगात ते कोसळल्याचा आवाज झाला नाही. साधारण दहा मिनिटांनी काहींनी त्यांना कोसळलेलं पाहिलं. त्यांच्या डाव्या कानातून रक्त येत होतं आणि ते बेशुद्ध पडले होते.

त्यांच्या सहप्रवाशांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण, ते शुद्धीवर आले नाहीत. पुढील एका स्थानकावर रेल्वेचे वैद्यकीय कर्मचारी आले आणि त्यांनी नारायणन यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

शवविच्छेदन करणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नारायणन यांच्या डाव्या कानातून येणारं रक्त हे त्यांच्याच चष्म्याच्या काचेमुळे आलं असाव. कारण, झोपण्यापूर्वी नारायणन यांनी चष्मा काढून शर्टच्या खिशात ठेवला होता. खाली पडल्यावर तो फुटला आणि त्याचीच काच नारायणन यांना लागली असावी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

वास्तविक, नारायणन यांना 57 क्रमांचा खालचा बर्थ मिळाला होता. मात्र, त्यांनी तो दुसऱ्या प्रवाशासोबत बदलून वरचा करून घेतला आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.