हिंदुस्थान आणि गोव्याचे नाते काळाबरोबर घट्ट होत गेले – पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा पोर्तुगालच्या अखत्यारीत होता, ज्यावेळी देशाच्या इतर मोठय़ा भागावर मुघलांचे राज्य होते. त्यानंतर या देशाने कित्येक राजकीय वादळे पाहिली, कित्येकदा सत्तेची उलथापालथ झाली. मात्र काळ आणि सत्तेच्या उलथापालथीनंतरही ना गोवा आपले हिंदुस्थानी नागरिकत्व विसरला, ना हिंदुस्थान आपला गोवा विसरला. गोवा आणि हिंदुस्थानचे हे नाते काळाबरोबर अधिक घट्ट होत गेले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गोव्यातील जनतेच्या एकनिष्ठsचे कौतुक केले.

गोवा दौऱयावर असलेले पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी विमानतळावर स्वागत केले. नंतर मोदींनी सेल परेड आणि फ्लायपास्टमध्ये सहभाग घेतला. पणजीच्या आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर पार पडलेल्या गोवा मुक्तिदिन सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक अणि ‘ऑपरेशन विजय’मधील दिग्गजांचा सन्मान केला. गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करणाऱया हिंदुस्थानी सशस्त्र दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेतील यश दरवर्षी 19 डिसेंबरला गोवा मुक्तिदिन म्हणून साजरे केले जाते. यंदा या कार्यक्रमाला मोदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

पंतप्रधानांनी नूतनीकरण करण्यात आलेले फोर्ट अगुआडा जेल म्युझियम, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साउथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि डावोरलिम-नावेलीम, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.