राज्य अजिंक्यपद किशोर कबड्डी; परभणी, नंदुरबार किशोर, तर पुणे, सांगली किशोरी गटाच्या अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान परभणी विरुद्ध नंदुरबार आणि पुणे विरुद्ध सांगली अशा अंतिम लढती ‘32 व्या किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी’ स्पर्धेत होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने परभणी जिल्हा कबड्डी असो.च्या यजमानपदाखाली साई क्रीडा मंडळ, खेडूळा यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. परभणी-पाथ्री येथील बुवा साळवी क्रीडानगरीत सुरू असलेल्या मुलांच्या उपांत्य सामन्यात परभणीने कोल्हापूरचे कडवे आव्हान 39-27 असे परतून लावत अंतिम फेरी गाठली.

पहिली जवळपास 20 मिनिटे चुरशीने खेळल्या या सामन्यात मध्यांतराला दोन्ही संघ 15-15 अशा बरोबरीत होते. शेवटच्या दहा मिनिटांत परभणीने आपल्या बाजूने झुकवला. मेहमूद शेखने एकाच चढाईत 3 गडी टिपत यात महत्त्वाचा वाटा उचलला. अंकुश भांडे, ज्ञानदीप भांडे, अतुल जाधव यांचाही खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. कोल्हापूरच्या शुभम रेपे, सुजल हेगडे यांनी चतुरस्र खेळ करीत काही काळ सामन्यात चुरस निर्माण केली, पण शेवटच्या टप्प्यात त्यांना तो जोश टिकविता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लावला. मुलींच्या उपांत्य सामन्यात पुण्याने कोल्हापूरचा प्रतिकार 46-30 असा मोडून काढत अंतिम फेरी गाठली. मध्यांतरापर्यंत अंदाज घेत सावध खेळ करणाऱया पुण्याने 24-22 अशी आघाडी आपल्याकडे राखली होती. उत्तरार्धात मात्र पुण्याच्या धनश्री तेली, भार्गवी रावडी यांनी धारधार चढाया व भक्कम पकडी करीत सामना 16 गुणांच्या फरकाने आपल्या नावे केला. कोल्हापूरच्या श्रद्धा जाधवची लढत एकाकी ठरली. दुसऱया उपांत्य सामन्यात सांगलीने गतविजेत्या मुंबई उपनगरचा संघर्ष 21-18 असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली.