
देशात कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 24) आढावा बैठक घेणार आहेत.
देशात 2 डिसेंबरला ओमायक्रोनचा शिरकाव झाला. कर्नाटकात दोन रुग्ण आढळून आले. गेल्या 20 दिवसांत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 228 वर गेली असून, 15 राज्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशात तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त होत आहे. तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, असा तज्ञांचा अंदाज आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी उद्या गुरुवारी बैठक बोलावली असल्याचे वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिले आहे.
केंद्राच्या राज्यांना सूचना
डेल्टापेक्षा ओमायक्रोन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी वॉर रूम पुन्हा सुरू कराव्यात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना कराव्यात. मोठय़ा प्रमाणावर चाचणी करावी. नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण ठेवावे. गेल्या आठ दिवसांत जेथे पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तसेच, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड 40 टक्के कोरोना रुग्णांनी व्याप्त असतील तेथे हे मार्गदर्शक तत्वे लावू शकता, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.



























































