
आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. जीवनगौरवही मिळाले. अनेक संस्था, कंपन्यांनी हे पुरस्कार दिले. जीवनगौरव म्हटला की वेगळं गांभीर्य येतं. पण इथे सगळंच वेगळं आहे. हा खूप ‘इंटरेस्टिंग’ पुरस्कार आहे. कारण हा एक माणसाने दिलेला जीवनगौरव आहे. निःस्पृहपणे काम करणाऱया अशोक मुळ्ये यांच्या कार्याला सलाम अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून ‘माझे असेही एक नाटय़संमेलन’ आणि ‘माझा पुरस्कार सोहळा’ आज दादर- माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगला. मुळ्ये यांच्या संकल्पनेतील या नाटय़संमेलनाचं हे चौथे वर्ष आहे. हंशा, टाळ्या, कोपरखळ्या यांनी संमेलन रंगले.
या कार्यक्रमात निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी तर विजय केंकरे स्वागताध्यक्ष होते. यावेळी रंगकर्मी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, मी आणि मुळ्ये आम्ही एकमेकांशी कधी बोललो नाही. कदाचित आमचा स्वभाव खूप वेगळा, पण तरीही त्यांनी माझा गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी इथे पोचलो आहे, असे कृतज्ञ उद्गार त्यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा जितेंद्र जोशी याला यावेळी ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’ यासाठी पटकथा लेखिका नमिता नाडकर्णी आणि मालिकेचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनाही ‘माझा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
मी बोलणार, तुम्ही ऐकणार
माझी पिच, माझी बॅट, माझा बॉल त्यामुळे इथे मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार, असे म्हणत अशोक मुळ्ये यांनी खणखणीत शाब्दिक चौकार-षटकार ठोकले. चार नाटय़संमेलने झाली. हे अखेरचे आहे. यापुढे ‘माझा पुरस्कार’ सुरू राहील, असे मुळ्ये म्हणाले.
मुळ्ये यांनी लिहिते व्हावे – चंद्रकांत कुलकर्णी
अशोक मुळ्ये म्हणजे रंगभूमीचा ऊर्जास्रोत. पुरस्कार खूप आहेत, पण मुळ्ये यांच्या पुरस्काराने पूर्णत्व येतं, असे संमेलनाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. मुळ्ये यांनी खूप वर्षे रंगभूमी बघितली आहे. अगदी रंगभूमीवर कामही केलंय. त्यांनी आता ‘परोपकारी गंपू’ च्या भूमिकेतून बाहेर येऊन लिहावे. त्यामुळे रंगभूमीचा चालताबोलता इतिहास वेगळ्या दृष्टीने आपल्या समोर येईल, अशी अपेक्षा चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.




























































