अबब! कानपूरच्या अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलं नोटांचं घबाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अत्तर व्यापाऱ्याच्या घरात आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत नोटांचं घबाड सापडलं आहे. अद्यापही आयकर विभाग त्याचं घर धुंडाळून काढत असून गेल्या 24 तासांपासून सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू आहे.

कन्नौज येथील अत्तर व्यापारी असलेल्या पीयूष जैन यांच्या कानपूरमधील घरावर आयकर आणि डीजीजीआय विभागाची गुरुवारी धाड पडली. या दरम्यान, जैन यांच्या घरातील कपाटांमध्ये त्यांना इतक्या नोटा सापडल्या की गेले 24 तास त्यांची मोजणी सुरू असून ती अद्याप संपलेली नाही.

त्या नोटा मोजण्याचं काम करण्यासाठी चार मशिन्सही मागवण्यात आली आहेत. तसंच, नोटा घेऊन जाण्यासाठी स्टीलचे सहा मोठे बॉक्स मागवण्यात आले आहेत. ही कारवाई अहमदाबाद येथील जीएसटी इंटेलिजन्स महानिदेशालय तसंच आयकर विभागाने संयुक्तरित्या केली आहे.

पीयूष जैन हे कन्नौज येथील अत्तर गल्लीत अत्तराचा व्यवसाय करतात. त्यांची कन्नौज, कानपूरसह मुंबईतही कार्यालयं आहेत. आयकर विभागाला जैन यांच्याकडील चाळीसहून अधिक कंपन्यांची माहिती मिळाली आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून जैन हे आपला व्यापार चालवतात. आजही कानपूरमधील पान मसाल्याच्या कंपन्या त्यांना लागणारं पान मसाला कम्पाउंड हे जैन यांच्याकडूनच खरेदी करतात.