
देशात ओमायक्रोनचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आतापर्यंत देशात 61 टक्के वृद्धांचे कारोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. तर 90 टक्के वृद्धांचा एक डोस पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत एकूण 141 कोटी कोरोना लसीचे डोस दिल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले दावे आणि आकडेवारीत मोठी विसंगती दिसत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाची आकडेवारी किती खरी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
देशाची लोकसंख्या सुमारे 125-130 कोटी आहे. कोरोना लसीकरणासाठी 130 कोटी लोकसंख्या आधारभूत मानल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 61 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झाल्याचा दावा केला आहे, त्यानुसार 79 कोटी 30 लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे 158 कोटी 60 लाख डोसचा वापर झाला आहे. तसेच 29 टक्के म्हणजे 37 कोटी 70 लाख लोकांना एक डोस मिळाला आहे. त्यामुळे एकूण 196 कोटी 30 लाख कोरोना डोसचा वापर होणे आवश्यक होते. मात्र पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना तर एकूण 141 कोटी कोराना लसीचे डोस वापरल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 55 कोटी 30 लाख लसी आल्या कुठून? त्या लसी दिल्या असतील तर सांगितल्या का नाहीत? आकडय़ांमधील या विसंगतीमुळे कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उभा राहिला आहे. देशाची लोकसंख्या 125 कोटी आधारभूत मानल्यास 61 टक्क्यांप्रमाणे डबल डोसचा आकडा 152 कोटी 25 लाख होत आहे. तर देशातील एक डोस घेणाऱ्यांचाही आकडा 36 कोटी 25 लाख आहे. त्यामुळे डोसचा आकडा 188 कोटींच्या पुढे जात आहे. याकडे पाहिले असता 48 कोटी डोसची विसंगती दिसत आहे.
उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आकडय़ांची फुगवाफुगवी
सध्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून कोरोना लसीकरणाच्या आकडय़ांची फुगवाफुगवी सुरू आहे. मोठे दावे केले जात आहेत. एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळातही मृतांचे आकडे लपवले होते, आता मात्र ते लसीकरणाचे आकडे वाढवून सांगत आहेत.





























































