महाविद्यालयांच्या पदवीदान सोहळय़ासाठी दीक्षान्त सभागृह खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक वारसा असलेले मुंबई विद्यापीठाचे सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृह यापुढे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांना पदवीदान समारंभ करण्यासाठी खुले होणार आहे. विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ पार पडल्यानंतर दीक्षान्त सभागृह महाविद्यालयांना उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या वार्षिक दीक्षान्त सोहळय़ात केली. याप्रसंगी राज्याचे मंत्री शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात पदवी स्वीकारण्याचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यामुळे महाविद्यालयांना पदवीदान समारंभ या सभागृहात घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने कुलगुरूंकडे करण्यात आली होती.

मुंबई विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास आहे. अलीकडेच विद्यापीठाला नॅककडून ‘ए प्लस प्लस’ मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात अभूतपूर्व योगदान असणाऱया मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाने सतत प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रीय समुद्रशास्त्र्ा संस्था संचालक प्रा. सुनील कुमार सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

  • डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डि.लीट. पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तर डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र्ा विषयात डि.एस्सी. पदवी देण्यात आली. ते अमेरिकेतून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी झाले होते.
  • n विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या 18 विद्यार्थ्यांना 19 पदके बहाल करण्यात आली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या यूटयूब चॅनलवर करण्यात आले.

2 लाख 12 हजार 579 स्तानकांना पदव्या प्रदान

दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण 2,12,579 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीसाठी 1 लाख 79 हजार 706 तर पदव्युत्तरसाठी 32 हजार 873 विद्यार्थ्यांना पदव्यांचा समावेश आहे. तसेच मुलींमध्ये पदवी स्नातकांची संख्या 83 हजार 158 आणि पदव्युत्तर स्नातकांसाठी 20 हजार 248 एवढी आहे. मुलांमध्ये पदवी स्नातकांची संख्या 96 हजार 548 आणि पदव्युत्तर स्नातकांसाठी 12 हजार 625 एवढी आहे. विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी 25 हजार 593, आंतरविद्याशाखेसाठी 10 हजार 98, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी 1 लाख 17 हजार 832 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 59 हजार 56 पदव्यांचा समावेश आहे. विविध विद्याशाखांतील 243 स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी.) पदवी प्रदान करण्यात आल्या.