दगडखाणींमुळे आजार झाल्यास कारवाई करणार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील दगडखाणीमुळे गावामध्ये लहान मुलांना व ज्येष्ठांना दमा व डोळ्यांचे आजार होत असल्याची तक्रार महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आलेली नाही. पण दगडखाणींमुळे आजार होत असल्यास त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आपल्या लेखी उत्तरात म्हणाले, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून 100 मीटरपेक्षा जास्तीच्या अंतरावर असणाऱ्या रेडिमिक्स प्लांटकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील ना हरकत दाखला प्राप्त करून घेतल्यानंतर या प्लांटकरिता पालिकेमार्फत तात्पुरती परवानगी देण्यात येते. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 22 रेडीमिक्स काँक्रिट प्लांट कार्यरत असून या प्लांटची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी पाहणी करण्यात येऊन दोषी आढळलेल्या उद्योगावर कारवाई करण्यात येते. केंद्र सरकारच्या निर्मल भारत अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एमएमआर क्षेत्रामध्ये निर्मल एमएमआर अभियान राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून याअंतर्गत मिरा-भाईंदर पालिकेमार्फत युवक प्रतिष्ठान या संस्थेला स्वच्छतागृह बांधण्याची कामे दिली असून एकूण 16 ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याची कामे पूर्ण केली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उत्तरात नमूद केले आहे.

कांदळवनाचे नुकसान केल्याने फौजदारी गुन्हे दाखल

राज्यातील सागर तटावरील जिह्यांकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत उपसमित्या स्थापन केल्या आहेत. मिरा भाईंदर पालिका क्षेत्रात कांदळवनाचे नुकसान केल्याबद्दल 2010 पासून आतापर्यंत एकूण 42 फौजदारी स्वरूपाचे गुन्हे महसूल विभागामार्फत दाखल करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कांदळवनाचा ऱहास करणाऱया बांधकाम व्यावसायिकांबाबत तसेच युवक प्रतिष्ठान या संस्थेने खोटी बिले सादर केल्याबाबतही चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.