
घरात कोणीच नसल्याचे पाहून हातसफाई करण्याच्या तयारीत असलेल्या नोकरासह एकाला ओशिवरा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मधुसूदन सिब लेंका आणि मोहम्मद साबीर वकील हाश्मी अशी त्यांची नावे असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार जोगेश्वरीच्या आदर्शनगर येथे राहतात. दोन महिन्यांपासून मधुसूदन हा त्याच्याकडे घरकाम करून तेथेच राहत होता. गेल्या आठवडय़ात तक्रारदार नातेवाईकाकडे गेल्या होत्या. घरात कोणीच नसल्याने मधुसूदनने कपाटाची बनावट चावी बनवण्यासाठी मोहम्मदला घरी बोलवले. मोहम्मद सायंकाळी चावी बनवत असतानाच तक्रारदार या घरी आल्या. तक्रारदारांनी दरवाजाची बेल वाजवली असताना आतून काहीच प्रतिसाद आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी शेजारच्याकडून घराची चावी घेऊन दरवाजा उघडला. तेव्हा मोहम्मद हा त्याच्यासमोर आला. तक्रारदारांनी मोहम्मदला विचारणा केली असता त्याने मधुसूदनने आपल्याला बनावट चावी तयार करण्यासाठी बोलवल्याचे सांगितले.





























































