नववर्षाचे स्वागत घरीच करा! मार्गदर्शक सूचना जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम असतानाच आता ओमायक्रोन हा विषाणूचा नवा अवतार आढळून आला आहे. ओमायक्रोनचा संसर्ग अतिशय वेगाने होतो. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी घरीच साधेपणाने करावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

ओमायक्रोनच्या विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. 31 डिसेंबरला मध्यरात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडतात. त्यामुळे यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

  • 31 डिसेंबर व 1 जानेवारीला नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच करावे.
  • 31 डिसेंबरच्या स्वागतासाठी बंदिस्त सभागृहात आयोजित होणाऱया कार्यक्रमांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेच्या तर खुल्या जागेत आयोजित कार्यक्रमांना क्षमतेच्या 25 टक्क्यांच्या मर्यादेत उपस्थितीला परवानगी.
  • रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी. अशा कार्यक्रमांना गर्दी नको. शारीरिक अंतर राखावे. मास्क–सॅनिटायझरचा वापर गरजेचा. कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी.
  • 60 वर्षांवरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
  • धार्मिक स्थळांवर एकाच वेळेस गर्दी करू नये.
  • 31 डिसेंबरच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी अशा ठिकाणी गर्दी करू नये.
  • नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका काढू नयेत. फटाक्यांची आतषबाजी करू नये.