चार महिन्यांनी झोपडपट्टीत पुन्हा नाकाबंदी! ऑगस्टनंतर पहिल्यांदाच पुन्हा 11 कंटेनमेंट झोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे चार महिन्यांपूर्वी कंटेनमेंट झोनमुक्त झालेल्या झोपडपट्टय़ांमध्ये पुन्हा एकदा ‘नाकाबंदी’ सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ल्यामध्ये 7, ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर 3 आणि वरळी विभागात एक कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत सद्यस्थितीत एकूण 128 पूर्ण इमारती सील असून 3020 मजलेही सील आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख 80 हजार घरांतील तब्बल सात लाखांवर रहिवासी निर्बंधांच्या कचाटय़ात सापडले आहेत.

मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागला आहे. दुसरी लाट पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला 100 पर्यंत नोंद होणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येने चार हजारांवर झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून वाढता कोरोना रोखण्यासाठी जास्त संख्येने रुग्ण आढळल्यास संबंधित भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये दोन रुग्ण आढळल्यास इमारतीचा मजला, तर दहा रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत सील करण्यात येत आहे. तर झोपडपट्टीमध्ये पाच ते दहा रुग्ण आढळल्यास संबंधित भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

अशी स्थिती बिघडतेय

ऑगस्टच्या मध्यावर झोपडपट्टय़ांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आल्यामुळे झोपडपट्टय़ा पूर्ण कंटेनमेंटमुक्त झाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून ‘डी’ वॉर्डमध्ये झोपडपट्टीत पहिला कंटेनमेंट झोन जाहीर झाला. यानंतर गेल्या दोनच दिवसांत कंटेनमेंट झोनची संख्या 2 वरून 11 वर गेली आहे.

अशी आहे सद्यस्थिती

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मुंबईत सद्यस्थितीत झोपडपट्टीतील 24 हजार घरांतील 1 लाख 23 हजार रहिवासी कंटेनमेंट झोनमध्ये आहेत.

128 पूर्ण सील इमारतीमधील 18 हजार घरांमधील 68 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.

3020 सील मजल्यांमधील 1.39 हजार घरांमधील 5 लाख 13 हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.