महिला डॉक्टरच्या घरी मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला डॉक्टरच्या घरी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या मोलकरणीला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. प्रिया राजेंद्र कौडर असे तिचे नाव आहे. तिच्याकडून दीड लाखाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

तक्रारदार या डॉक्टर असून त्या अंधेरी परिसरात राहतात. त्याच्याकडे प्रिया ही पूर्वी घरकाम करत होती. घरकामादरम्यान प्रियाला कपाटाच्या चाव्या कुठे असतात हे माहीत होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन प्रिया ही हातसफाई करायची. तक्रारदार यांनी बॅगेत ठेवलेले ती पैसे चोरत होती. बॅगेत ठेवलेले पैसे कमी होत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. सुरुवातीला त्यानी त्याकडे दुर्लक्ष केले. डिसेंबर महिन्यात तक्रारदारांनी कामानिमित्त एटीएममधून पैसे काढून आणले होते. ते पैसे त्यानी बॅगेत ठेवले होते. बॅगेतून पुन्हा पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी प्रियाला जाब विचारला. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदारांनी प्रियाला कामावरून काढून टाकले होते.

काही दिवसांपूर्वी तक्रारदाराचा साखरपुडा असल्याने त्यांनी कपाटात ठेवलेले दागिने तपासले. तेव्हा त्यांना कपाटात दागिने कमी दिसले. दागिने चोरीप्रकरणी तक्रारदारांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर प्रियाने चोरीचे दागिने अंधेरी येथील एका ज्वेलर्सला दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ते दागिने ज्वेलर्सकडून हस्तगत केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यात प्रियाला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.