असाही एक निरोप समारंभ, निवृत्तीनंतर शिक्षकाची हत्तीवरून मिरवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध वेगळेच असतात. याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच राजस्थानच्या भिलवाडा गावात घडली. शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षकाला चक्क हत्तीवर बसवून विद्यार्थ्यांनी निरोप दिला. केवळ विद्यार्थीच नव्हे तर गावातील अनेक जण या मिरवणुकीत सहभागी झाले. निरोपाच्या वेळी गावकरी भावुक झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले.

भिलवाडा येथील अरवड गावातील सरकारी शाळेत भवरलाल शर्मा शिकवायचे. ते विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके शिक्षक आहेत. नुकतचे ते सेवानिवृत्त झाले. 20 वर्षे प्रामाणिकपणे ज्ञानदान करणाऱया शिक्षकांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थ्यांसह गावकऱयांनी त्यांची अनोखी मिरवणूक काढली. मिरवणुकीत भवरलाल यांना हत्तीवर बसवण्यात आले.

दोन लाख रुपये शाळेला दान

भवरलाल शर्मा यांनी निवृत्तीच्या वेळीही मोठे आणि कौतुकास्पद काम केले आहे. त्यांनी दोन लाख रुपये विद्यार्थ्यांच्या कॉम्युटर लॅबसाठी दान दिले. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना अरवड गावातून उत्साहात निघालेली ही मिरवणूक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनोख्या ऋणानुबंधाचे प्रतीक ठरली आहे.