
जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यात सुरक्षा दलांनी बुधवारी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तीन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला. चांदगाम परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सकाळच्या सुमारास सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत तिघांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा दलांनी यश मिळवले. दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी असून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रs जप्त केली आहेत.
कश्मीर झोन पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. दहशतवाद्यांकडून दोन एम-4 कार्बाइन्स, एक एके-47 रायफल तसेच इतर स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जम्मू- कश्मीरातील दहशतवादी कारवाया थोपवण्याच्या हेतूने सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी दक्षिण कश्मीरच्या कुलगाम जिह्यातदेखील दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. हे दोघे स्थानिक दहशतवादी लश्कर-ए-तोएबासाठी काम करीत होते. घरात लपून बसलेल्या या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. त्याआधी गेल्या आठवडय़ात मिरहामामध्ये पाकिस्तानी जैश कमांडरसह तिघांचा खात्मा करण्यात आला.
महिनाभरात सात पाकिस्तानींसह एकूण 29 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.























































