सोलापूर- पुलाला कार धडकून चार तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम सुरू असलेल्या पुलाला कार धडकून चार तरुणांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर-विजापूर रोडवरील कवठे गावाजवळ पहाटे ही घटना घडली आहे. अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महिबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैपनसाब शेख (वय 20), मुन्ना केभावे (वय 21) अशी मृत तरुणांची नावे आहेत, तर पैगंबर मुल्ला (वय 20, सर्व रा. यरगल केडी, ता. सिंदगी, कर्नाटक) हा जखमी झाला आहे.

वरील सर्वजण कार्यक्रमानिमित्त पुण्याकडे महिंद्रा झायलो कारमधून निघाले होते. सोलापूर-विजापूररोडवरील कवठे गावाजवळ पहाटे दोनच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या पुलाला त्यांची कार धडकली. यात पाचहीजण गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, अरुण लक्ष्मण, महिबुब मुल्ला, फिरोज शेख, मुन्ना केभाव या चौघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला, तर पैगंबर मुल्ला गंभीर जखमी असून, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.