
हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध जोडपं म्हणून परिचित असलेल्या आमीर अली आणि संजिदा शेख यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेले अनेक दिवस हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. कायदेशीररित्या विभक्त होत असल्याच्या बातमीचा गाजावाजा होऊ नये अशी या दोघांचीही इच्छा होती.
त्यामुळे वेगळं होण्याच्या निर्णयावर या कलाकारांनी मौन राखणे पसंत केले आहे. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया 9 महिन्यांपासून सुरू होती. दोघांनी वेगळं होत आपापलं आयुष्य कंठायला सुरुवात केली आहे असं या जोडप्याच्या निकटवर्तियाने सांगितले आहे.
हिंदुस्थान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलं आहे की घटस्फोटाच्या निर्णयानंतर या दोघांची मुलगी आयरा ही संजिदासोबत राहणार आहे. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने संजिदा आणि आमीर यांच्याशी संपर्क साधून घटस्फोटाचे वृत्त खरे आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. असं असली तरी आमीरने संजिदा तिच्या आयुष्यात सुखी राहावी असं आपल्याला वाटत असल्याचं म्हटलं आहे.
आमिर अली आणि संजिदा शेखने 2012 साली लग्न केले होते. या जोडप्याकडे हिंदी मालिका विश्वातील सगळ्या सुंदर जोडपे म्हणून पाहिले जात होते. सरोगसीच्या माध्यमातून हे दोघे आई-बाबा झाले होते.
सगळं सुरळित सुरू आहे असं वाटत असताना 2020 सालापासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या.
दोघे वेगळे राहात असल्याच्याही चर्चा तेव्हा जोरात सुरू झाल्या होत्या.अखेर या दोघांमधील नात्यात आलेल्या वितुष्टाच्या बातम्या खऱ्या ठरल्या असून दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.




























































