
ओमायक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू करून सर्वांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अशी मागणी शिक्षक भारतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. मुंबईत ओमायक्रोनची सुनामी आलेली आहे. दर दिवशी पंधरा हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू ठेवणे धोकादायक ठरत आहे. शेकडो मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी नव्या व्हेरिएंटमुळे आजारी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष शाळेत येऊन अध्यापन करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले.

























































