
विधानसभा निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांत भाजपचे सरकार आहेत. देशाचे सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निकालांकडे असणार आहे.
403 विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशात आरोग्य यंत्रणेचे पूर्ण वाभाडे निघाले. मृत रुग्णांचे पार्थिव देह गंगेत फेकून द्यायची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली. गंगा किनाऱ्यांवर मृतदेहाचे दफन करावे लागले. हे हृदयद्रावक चित्र अवघ्या देशाने पाहिले.
गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली. कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे.
भाजपची लढत सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती आणि काँग्रेस पक्षाबरोबर आहे.
उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या दोन महिन्यांपासूच प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन करताना जाहीर सभा घेतल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीकडेही अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध पंजाबमधील शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले आणि प्रचंड लढा उभारला. शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे मोदी सरकार झुकले आणि तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले.
पंजाबमधील जनता, शेतकऱ्यांचा आजही भाजपविरुद्ध रोष आहे. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री बदल करण्यात आला. त्यामुळे नाराज अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष काढून भाजपबरोबर युती केली. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’लाही चांगला पाठिंबा मिळत आहे.
22 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन नवीन पक्ष काढला आहे.
भाजपपासून फारकत घेतलेला अकाली दल स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे.
पंजाबमध्ये सध्या काँग्रेस, आप, भाजप, अकाली दल या चार पक्षांत लढत होईल, असे चित्र दिसत असले तरी भाजपसाठी स्थिती फारशी अनुकूल नाही.




























































