एसटी भाड्यात सवलतीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, कोतवाली पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे एसटीत प्रवासभाड्याचे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज दाखल करणाऱ्या चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम विष्णुकांत राठी (रा. कोपरगाव), सुनील खंड पवार (रा. सुरेगाव, ता. कोपरगाव), विश्वनाथ ज्ञानदेव फाळके (रा. निंबोडी, ता. कर्जत), महेश दशरथ मते (रा. सावेडी, नगर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. ‘समाजकल्याण’चे सहायक सल्लागार दिनकर भाऊराव नाठे (वय 42 रा. अंबिकानगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

नाठे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांकडील 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या कागदपत्रांची पडताळणी करून एसटी प्रवासभाड्यात सवलत मिळण्याबाबत ओळखपत्र देण्याचे काम आहे. 2 मे 2018 रोजी वरील चौघांनी त्यांच्याकडे अर्ज केले होते. त्यासोबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडील 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर केले. मात्र, सही व हस्ताक्षरात तफावत दिसून आल्याने त्यांनी प्रमाणपत्रांबद्दल जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती घेतली. मात्र, ते प्रमाणपत्र दिल्याबाबत नोंद नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाकडून नाठे यांना कळविण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण सक्षम न्यायाधिकारी तथा आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या कार्यालयात पाठविले. त्या कार्यालयाकडून समाजकल्याण विभागाला संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार नाठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार तपास करीत आहेत.