
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा मालडोंगरी गावाजवळच्या शेतातील विहिरीत एका महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ज्या विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले त्याच विहिरीत बिबट्याचा एक बछडाही मृतावस्थेत आढळून आला.
ब्रम्हपुरी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावरील मौजा मालडोंगरी येथील दिपा रवींद्र पारधी (वय – 33) ही महिला आयुष (वय – 6) व पियूष (वय – 3) या आपल्या मुलांसह कालपासून बेपत्ता होती. आज तिचा शोध शोध सुरू असताना गावाजवळच्या एका विहिरीत तीनही मायलेकांचे प्रेत आढळून आले. या तिघांचे प्रेत काढत असताना याच विहिरीत एक बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला.
बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळ्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. बिबट्याचा बछडा अंदाजे 3 महिन्यांचा असल्याचे सांगण्यात येत असून विहिरीजवळ मातीकाम करण्यात आले असल्यामुळे चुकून तो विहिरीत पडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. बिबट्याच्या बछड्याला ब्रम्हपुरी उपवसंरक्षक कार्यालय येथे आणण्यात आले असून उद्या शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे यांनी दिली.





























































