लेख – महाराष्ट्राचे दैवत – राजमाता जिजाबाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रणवीर राजपूत

राजमाता जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा सुवर्णकाळ होय. शिवरायांसारखा आदर्श व चारित्र्यवान राजा घडविला तो जिजामातांनी. त्या शिवबांच्या स्फूर्तिस्थान व मार्गदर्शक होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रणेत्या होत्या. स्वतंत्र मराठी साम्राज्य स्थापनेचं दिव्य स्वप्न त्यांनी शिवरायांपुढे ठेवलं. जिजामातेचं पुत्रप्रेम अजोड होतं तर शिवबांची मातृभक्ती अपरंपार होती. अशा महान मातेची आज जयंती.

जिजामाता या केवळ शिवबांच्या माता नव्हत्या तर त्या स्वराज्य माताही होत्या. त्याबरोबरच त्या महाराष्ट्राच्या दैवत होत्या. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिह्यातील शिंदखेडाराजा येथील लहुजीराव जाधव यांच्या राजघराण्यात झाला अन् जणू हिंदवी स्वराज्याची जननी उदयास आली. जिजाऊ या राजमाता असूनही त्यांना आपल्या जीवनकाळात विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांचं सांसारिक जीवन अत्यंत धावपळीत, ताणतणावात व कष्टात गेलं. राजे शहाजी हे आदिलशहांच्या राज्यात सरदार म्हणून होते. त्यामुळे शिवबांची जडणघडण अन् त्यांना मराठी साम्राज्याचा राजा बनविण्याची संपूर्ण जबाबदारी जिजामातांवर आली होती. अशा कठीण, अस्थिर व संकटमय परिस्थितीत जिजाऊंनी मोठय़ा धैर्याने अन् आत्मविश्वासाने आपले जीवन मार्गक्रमित करून आलेल्या समस्यांना समर्थपणे सामोरे गेल्या, पण यत्किंचितही डगमगल्या नाहीत. त्यांचं रयतेशी वागणं अत्यंत संयमशील व स्नेहाचं होतं. त्या खऱया अर्थाने न्यायदेवता होत्या. जिजाऊ या वीरपत्नी व वीरमाता म्हणून सर्वांना आदर्शवत होत्या अन् आजही आहेत.

स्वराज्याची स्थापना करण्याचा जिजाऊंना मोठा ध्यास होता. इतकेच नव्हे तर निजामांच्या-मोगलांच्या जुलुमी राजवटीचा अंत व्हावा यासाठी जिजाऊ या नेहमी माँ जगदंबेला साकडे घालत असत. जिजाऊंच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि निस्सिम देशभक्तीचे हे खरे द्योतक आहे.

राजमाता जिजाबाईंनी शिवबांसह त्यांचे निष्ठावान मावळे तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, दाजी जेधे, त्रिंबक सोनदेव, जिवा, संताजी- धनाजी, बाजीप्रभू देशपांडे आदींना स्वराज्याचे महत्त्व व उपयुक्तता याची कल्पना देऊन त्यांच्यात दुर्दम्य राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली. निजामांच्या मनात कपट होतं, हे जिजाऊ चांगल्याप्रकारे जाणत होत्या. जिजाऊंनी स्वराज्याची हाक दिली. त्या वाघिणीसारख्या चवताळल्या अन् म्हणाल्या, ‘गुलामगिरीसारखं दुसरं मोठं दुर्दैव नाही आणि ते सहन करण्याएवढं मोठं पाप नाही. 300 वर्षांच्या या दुर्दैवाला स्वराज्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या भ्रष्ट झालेल्या भूमीवर स्वराज्याचे पीक काढायचं असेल तर त्याआधी निजामांच्या घरांवर नांगर फिरविण्यास सिद्ध व्हा.’ जिजाऊंचे हे आवेशपूर्ण प्रखर विचार ऐकून मावळ्यांच्या रूपातली ही चिमुकली मुलं पुढे शूरवीर सरदार बनली. बघता बघता, शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली या शूरवीर सरदारांनी व सैनिकांनी अखेर जिजाऊंच्या स्वप्नातल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक मोठय़ा थाटामाटात संपन्न झाला. गुलाल उधळत, ढोल-ताशे वाजवत अन् तुतारीच्या गगनभेदी निनादात रायगडाचं सारं वातावरण ढवळून निघालं होतं. राजे, महाराजे, सरदार यांनी या सोहळ्यास आवर्जून हजेरी लावली होती. काशीच्या गागाभट्टांकडे राज्याभिषेकचे पौरोहित्य सोपविण्यात आले होते. राज्याभिषेक संपन्न झाल्याचे घोषित केल्यावर शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. त्यानंतर शिवरायांनी मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे आशीर्वाद घेतले. उपस्थित पाहुण्यांनी शिवाजी महाराजांचं अभिनंदन केलं. जिजाऊंचे आशीर्वाद घेण्यासाठी शिवराय राजमातेच्या आसनाजवळ आले. त्यांनी जिजाऊंचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्या वेळी त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागलं होतं. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या तृप्त झाल्या, धन्य झाल्या. त्यांनी शिवरायांची दृष्ट काढली. छत्रपतींना आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, ‘शिवबा तुम्ही राजे झालात, छत्रपती झालात. मराठी साम्राज्याचे राजे झालात. रयतेचे राजे झालात.’ जिजाऊ माँसाहेबांनी ‘सोनियाचा दिवस’ पाहिला. त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. त्यांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. त्यासाठी सारा महाराष्ट्र जिजाऊंचा ऋणाईत झाला.