जेनोट्रान्सप्लँटेशन – एक अनोखे तंत्रज्ञान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

जगात पहिल्यांदाच एका अमेरिकन व्यक्तीला आनुवंशिक रूपात परावर्तित करण्यात आलेले डुकराचे हृदय ट्रान्सप्लॅंट करण्यात आले आहे. डेव्हिड बेनेट या 57 वर्षीय रुग्णावर बाल्टिमोर येथे तब्बल सात तास ही सर्जरी सुरू होती. जर ही सर्जरी झाली नसती, तर बेनेट जिवंत राहण्याची काही शक्यता नव्हती. याच आधारावर अमेरिकेच्या आरोग्य खात्याने ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटर’च्या डॉक्टरांना या सर्जरीसाठी विशेष परवानगी दिली होती. सर्जरीनंतर आता बेनेट हळूहळू स्वस्थ होत आहेत असे डॉक्टरांनी सांगितले.

ही सर्जरी करणाऱ्या वैद्यकीय पथकाने अनेक वर्षांच्या संशोधनाच्या आधारे ही कामगिरी पार पाडली आहे. त्यांचे हे यश जगभरातील अनेक रुग्णांचे कष्टदायी जीवन सुखकर बनवण्याच्या दिशेनं पडलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. फक्त अमेरिकेतच रोज ट्रान्सप्लॅंटची वाट बघणाऱ्या 17 लोकांचा मृत्यू होत असतो, तर एक लाखापेक्षा जास्त अमेरिकन नागरिक आज ट्रान्सप्लॅंटसाठीच्या ‘वेटिंग लिस्ट’वर आहेत. यावरून आपण जगभरातील परिस्थितीचा अंदाज सहज लावू शकतो.

ट्रान्सप्लॅंटेशनची ही गरज बघता संशोधक फार पूर्वीपासून जनावरांचे अवयव मानवी शरीरासाठी उपयोगी पडू शकतील का? या विषयावर संशोधन करत आहेत. याला ‘जेनोट्रान्सप्लॅंटेशन’ असे संबोधले जाते. डुकराच्या हृदयाच्या व्हॉल्व्हचा वापर आता मानवासाठी सर्रास होऊ लागला आहे. ही जेनोट्रान्सप्लॅंटेशनची कमाल आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये न्यूयॉर्कच्या एका वैद्यकीय पथकाने डुकराची किडनी एका मानवामध्ये यशस्वीरीत्या ट्रान्सप्लॅंट केल्याची घोषणा केली होती. त्यावेळी जेनोट्रान्सप्लॅंटेशनच्या क्षेत्रातील तो सर्वात मोठा यशस्वी प्रयोग मानला गेला होता. मात्र ज्या रुग्णावर हा प्रयोग करण्यात आला होता, ती व्यक्ती ‘ब्रेनडेड’ अवस्थेत होती आणि तिच्या जगण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

यावेळच्या प्रयोगात बेनेट यांना जे डुकराचे हृदय बसवण्यात आले आहे, ते हृदय आनुवंशिक रूपात ‘मॉडिफाय’ करण्यात आले आहे. त्यामुळे बेनेटच्या शरीराला ते सहजपणे स्वीकारता येईल असा उद्देश होता. या सर्जरीपूर्वी बेनेट सहा आठवडे बेडवर होते. ते हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना मशीनच्या मदतीने जिवंत ठेवण्यात आले होते. बेनेट आता स्वतःहून व्यवस्थित श्वास घेऊन शकत असले, तरी डॉक्टरांनी अजूनही त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवले आहे. बेनेट यांच्या पुढील आरोग्याबद्दल डॉक्टरांनी अजून काही ठामपणे सांगितले नसले, तरी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक या प्रयोगामुळे अत्यंत उत्साही झाले आहेत. यापूर्वी मानवी शरीरासाठी असा प्रयोग कधीच करण्यात आला नव्हता. संशोधकांनी मानवी शरीरासाठी एक मोलाचा विकल्प शोधून काढला आहे असे तज्ञांना वाटते. अर्थात सर्वांचे लक्ष आता बेनेट यांच्या प्रकृतीवर असणार आहे. पुढचे किती दिवस, महिने किंवा वर्ष बेनेट जगतात यावर या प्रयोगाचे यशापयश निर्भर असणार आहे असेदेखील संशोधकांचे मत आहे.

स्वतः बेनेट यांनी सर्जरीच्या आधी ‘‘हे ट्रान्सप्लांट म्हणजे माझ्या आयुष्यासाठी जियो या मरो’च्या लढाईसारखे आहे. मला कल्पना आहे की, हे अंधारात बाण चालवण्यासारखे आहे, पण माझ्यासाठी ही शेवटची संधी आहे’’ असे सांगितले होते. अगदी सर्जरीच्या आधीदेखील ‘‘मी लवकरात लवकर बरा होऊन बेडमधून बाहेर पडून फिरण्यासाठी उतावळा झालो आहे’’ असा आत्मविश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला होता.

[email protected]