बार्शीच्या फटेचा ‘विशाल’ स्पॅम तक्रारी वाढल्या; फसवणुकीची रक्कम साडेअठरा कोटींवर, पोलिसांची आठ पथके मागावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर तिपटीने परताव्याचे आमिष दाखवून बार्शीकरांना गंडविणाऱ्या विशाल फटेविरुद्ध दररोज फसवणुकीच्या तक्रारी वाढत असून, रविवारपर्यंत 78 जणांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फसवणुकीची रक्कम साडेअठरा कोटींच्या पुढे गेली आहे. फटे सध्या पत्नी व मुलीसह फरार असून, आठ पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत.

बार्शी शहरात तीन वित्तीय संस्था स्थापन करून राजकीय, सामाजिक, व्यापारी, उद्योजक, अधिकारी, पत्रकार व सामान्य लोकांकडून शेअर बाजारातील गुंतवणुकीवर तिपटीने परताव्याचे आमिष दाखवून विशाल फटे याने कुटुंबीयांच्या मदतीने कोटय़वधी रुपयांची माया जमवून फरार झाला आहे. जवळच्या मित्रानेच फिर्याद दिल्याने राज्यभर खळबळ उडवून देणारा हा घोटाळा बाहेर पडला आहे. चौकशीच्या भीतीने फसवणूक झालेले नागरिक व तक्रार देण्यास पुढे येत नसताना पोलिसांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत 78 जणांनी विशाल फटेविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे. यात शेकडो लोकांची फसवणूक झाली असून, प्राथमिक तक्रारीत 18 कोटी 53 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. ही रक्कम जुजबी असून, अद्यापही काही लोक तक्रार देण्यास घाबरत आहे. गुंतवणुकीची चौकशी हाईल, या भीतीपोटी रोखीने भरलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यांना तक्रार देण्यास पोलिसांनी आवाहन केले आहे. या स्पॅममुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे हाल मात्र वाढत चालले आहेत. अनेकांनी बचत केलेले, शेत व घर विक्री करून चारितार्थासाठी ठेवलेले पैसे यात गुंतविल्याची माहिती समोर आली आहे.

‘लूक आउट’ नोटीस बजावण्याची तयारी
याप्रकरणी विशाल फटेचे वडील अंबादार फटे व भाऊ वैभव फटे या दोघांना अटक करण्यात आली; परंतु मुख्य आरोपी विशाल फटे हा पत्नी व मुलीसह फरार आहे. त्याच्याकडे परदेशवारीचा पासपोर्ट असून, बार्शी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ‘लूक आउट’ कारवाईची तयारी केली आहे. विशाल फटेच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची आठ पथके मागावर आहेत.

एमबीए नव्हे, बीए पास होता फटे
विशाल फटे हा प्राध्यापकाचा मुलगा… तो धड 12वी सुद्धा पास होऊ शकला नाही. बहिस्थ विद्यार्थी म्हणून तो शिक्षण घेत बीए पास झाला; पण त्याने लोकांना भुलवत एमबीएची पदवी घेतल्याचे सांगत होता.