‘हे’ आहे जगातलं सगळ्यात विषारी झाड! पेरूसारख्या दिसणाऱ्या फळाने जाऊ शकतो जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्ग हा एक चमत्कार आहे. त्यात अनेक विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातल्या काही घातक देखील असतात. विशेषतः अनेक वनस्पती, फुलं, फळं, प्राणी हे विषारी असतात. संरक्षणासाठी ती योजना निसर्गाने केलेली असते.

पण, या सगळ्यात सर्वाधिक विषारी झाड कोणतं असावं, असा प्रश्न हमखास पडतो. या झाडाला मँचिनेल असं म्हणतात. अत्यंत निरुपद्रवी वाटणारं हे झाडं वास्तविक जगातलं सर्वाधिक विषारी झाड आहे. त्याला पेरूसारखी दिसणारी फळं येतात. हे उत्तर कोरा या प्रश्नोत्तर असलेल्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.

सगळ्यात विषारी झाड कोणतं, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मँचिनेल झाड होय. हे झाड प्रामुख्याने कॅरिबियन बेटे, फ्लोरिडा, बहामा, मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळून येतं. या झाडाला गोड वासाची, पेरूसारखी दिसणारी या झाडाची फळे माणसाचा जीव घेऊ शकतात. याच्या पानांना स्पर्श केल्याने अंगावर वेदनादायी व्रण उठू शकतात. इतकंच नव्हे तर पावसात या झाडाखाली निवाऱ्यासाठी उभं राहिल्याने विषबाधा होऊ शकते.

या झाडाला जाळल्यास त्यातून निघणारा विषारी धूर थोडा वेळ आंधळा बनवू शकतो. मँचिनेल झाडांमध्ये अनेक विषारी घटक असतात. त्यापैकी फोरबॉल हा घटक अत्यंत हानिकारक असतो. ही झाडे एवढी धोकादायक आहेत कि लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून ठिकठिकाणी ह्या झाडांभोवती धोक्याचा इशारा देणारे फलक लावले जातात.

असं असलं तरी या झाडाचे इतर बरेच फायदे आहेत. गेल्या कित्येक शतकांपासून कॅरिबियन सुतार ह्या विषारी झाडाचा वापर फर्निचर बनविण्यासाठी करीत आले आहेत. त्यासाठी हे झाड खूप काळजीपूर्वक तोडलं जातं आणि काही दिवस उन्हामध्ये सुकवलं जातं. जेणेकरून त्यातील विषारीपणा निघून जाईल.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात देखील झाडे खूप महत्वाची भूमिका निभावतात. या झाडांची मुळे जमिनीत घट्ट रुतलेली असतात जी किनारपट्टीची धूप होण्यापासून प्रतिबंध करतात. प्राचीन काळी युद्धादरम्यान ह्या झाडांचा वापर शत्रूचे पाण्याचे स्रोत दूषित करण्यासाठी केला जायचा. स्थानिक लोक मँचिनेल फळांचे विष बाणाच्या टोकाला लावायचे तसेच शिक्षा म्हणून अपराध्यांना या झाडाला बांधून ठेवायचे. कालान्तराने त्यांचा वेदनांनी तळमळून मृत्यू व्हायचा.