मुंबईत पालिका साकारणार विज्ञान उद्यान, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी व्यवस्था, योगा, खेळ यासह पायी चालण्यासाठी अनोखी व्यवस्था आणि विज्ञान उद्याने पालिका मुंबईत साकारणार आहे. या अनोख्या मोहिमेत पालिका पहिल्या टप्प्यात चार उद्यानांचा विकास करणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (नियोजन) किरण दिघावकर यांनी दिली.

पर्यटन-पर्यावरण मंत्री आणि उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात आता उद्यानांचा अत्याधुनिक आणि अद्ययावत पद्धतीने विकास करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा विकास निधीतून मुंबईच्या उपनगरात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यात पूर्व व पश्चिम उपनगरातील चार उद्यानांवर संकल्पना उद्याने साकारण्यात येणार आहेत. या कामांसाठी जिल्हा विकास निधीतून 25 कोटींचा निधी दिला आहे. त्याअंतर्गत पालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून चार उद्यानांचा विकास करण्यात येणार आहे. यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विक्रोळीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यान, घाटकोपरमधील पंकेशा मनोरंजन मैदान, कांदिवली येथील राजे शिवाजी मैदान, दहिसर गावठाणातील एका भूखंडावर ही उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. त्यात विक्रोळीत अनवाणी पावलांसाठीचे खास उद्यान तर घाटकोपरमध्ये विज्ञान उद्यान उभारण्यात येणार आहे.

अशी असणार उद्याने

 दहिसर गावठाण येथील 4975 चौ. मीटरच्या भूखंडावर कबड्डी, क्रिकेट अशा विविध खेळांसाठीची मैदाने तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी खास क्रीडा प्रकार उद्यान साकारण्यात येणार आहे.

 विक्रोळीतील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात अनवाणी पावलासाठीचे खास उद्यान साकारण्यात येणार आहे. गवतावरून, गुळगुळीत दगडांवरून, विशिष्ट पोत असलेले पदपथ, मातीचे पदपथ साकारण्यात येणार आहेत.

 कांदिवलीतील सेक्टर-1मध्ये राजे शिवाजी मैदानात वाहतूक नियमांचे धडे देणारे वाहतूक उद्यान साकारण्यात येणार आहे. यात वाहतूक चिन्हे, लहानसे पादचारी पूल साकारून वाहतूक व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

 घाटकोपर येथील पंकेशा मैदानावर विज्ञान उद्यान साकारण्यात येणार आहे. यात मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागेबरोबरच वैज्ञानिक खेळणी, एम्फीथिएटर पद्धतीची बैठक व्यवस्था यांचा समावेश असेल.