तिहार तुरुंगात अचानक झाली तपासणी; कैद्याने गिळला मोबाईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरुंग प्रशासनाची नजर चूकवून कैद्यांना अनेक गोष्टी पुरवण्यात येतात, अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना तिहार तुरुंगात उघडकीस आली आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात अचानक तपासणी हाती घेण्यात आली. त्यावेळी घाबरून एका कैद्याने त्याच्याकडे असलेला मोबाईलच चक्क गिळला. त्यानंतर त्याला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

तिहार तुरुंगात एका कैद्याने पोटदुखी होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्याला जीबी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. कैद्याच्या पोटदुखीचे कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्याची एंडोक्सोपी करण्याचा निर्णय घेतला. एंडोक्सोपीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. कैद्याच्या पोटात मोबाईल अडकल्याचे डॉक्टरांना दिसले.

कैद्याच्या पोटात मोबाईल असल्याचे आढळल्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर आता कैद्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगात अचानक तपासणी हाती घेण्यात आली होती. त्यावेळी या कैद्याने स्वतःकडे असलेला मोबाईल लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला मोबाईल लपवण्याची जागाच सापडली नाही. त्यामुळे तपासणीला घाबरून त्याने मोबाईल चक्क गिळून टाकला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मोबाईल गिळल्यानंतर काही दिवसांनी त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला जीबी पंत रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची एंडोस्कोपी केल्यावर त्याच्या पोटात मोबाईल असल्याचे डॉक्टरांना दिसले. कैद्याच्या पोटातील मोबाईल काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, असे रुग्णालयातील डॉक्टर सिद्धार्थ यांनी सांगितले. कैद्यावर 15 जानेवारीला शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील मोबाईल बाहेर काढण्यात आला.

ही शस्त्रक्रिया खूप जटील होती. मोबाईल अडकल्याची जागा निश्चित करून एका पाईपद्वारे फोन बाहेर काढण्यात आला. अशा शस्त्रक्रियेत पोटातील कोणतीही जड वस्तू बाहेर काढताना श्वसन आणि अन्ननलिका दाबल्या जाणार नाहीत, त्यांना कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ही जटील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर कैद्याची प्रकृती स्थिर आहे.

कैद्याच्या पोटात किपॅडवाला मोबाईल अडकला होता. तो मोबाईल 6 इंच लांब होता, असे डॉक्टरांनी सांगितले. मोबाईल पोटात कसा गेला याची विचारणा केल्यावर कैद्याने तपासणीला घाबरून आपण मोबाईल गिळल्याचे डॉक्टरांना सांगितले. याआधीही तिहार तुरंगात अशाप्रकारच्या घटना घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.