सामना अग्रलेख – गोव्यात बंडाळीचे फटाके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे? उत्पल जिद्दीने मैदानात उतरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील. पण त्यांची लढाई भाजपच्या बेइमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नये!

उत्तर प्रदेशच्या तुलनेत गोवा हे लहान राज्य असले तरी दोन्ही राज्यांचे राजकीय चरित्र सारखेच आहे. राजकीय निष्ठा, विचार, भूमिका याचा ताळतंत्र सोडून लोक सर्रास इकडून तिकडे उडय़ा मारीत आहेत. हिंदी पट्टय़ांत आयाराम-गयारामांचे प्रताप दिसू लागले आहेत. तसे गोव्याच्या निवडणुकीत आलेमाव-गेलेमावचे युग गेल्या काही काळापासून सुरू झाले आहे. गोव्यासारख्या एकेकाळच्या सत्त्वशील राजकारणाची सूत्रे आता मूठभर प्रस्थापित जमीन माफिया, ड्रग्जचे व्यापारी, दलाल मंडळींच्या हाती गेल्याने तेथील सामान्य माणसाची अवस्था चिंताजनक झाली आहे. गोव्यातील सर्वच राजकीय पक्ष या स्थितीस जबाबदार आहेत. भारतीय जनता पक्षाने गोव्यातील 34 उमेदवारांची यादी जाहीर करताच त्या पक्षातही बंडखोरीचे फटाके फुटू लागले. भाजपने जे पेरले तेच उगवले. त्यामुळे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस तरी काय करणार? माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कापल्याने या सगळ्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले. पक्षशिस्त, मोदी-शहांचे भय, ईडी वगैरेचे भय न बाळगता भाजपमध्ये बंडाळीची लाट उसळली आहे. अर्थात गोव्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत ते उत्पल पर्रीकर. मनोहर पर्रीकरांच्या या पुत्रास भाजपने उमेदवारी नाकारली आहे व उत्पलसुद्धा बंडाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. उत्पल पर्रीकर यांचे कर्तृत्व काय व भाजपमध्ये घराणेशाहीच्या निकषांवर उमेदवाऱया मिळत नाहीत, असे प्रवचन यानिमित्त झोडण्यात आले तो म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. खुद्द पणजीत ज्या बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली, त्यांच्या पत्नीस बाजूच्या ताळगाव मतदारसंघांची उमेदवारी बहाल केली आहे. दुसरे म्हणजे विश्वजित राणे यांना वाळपई मतदारसंघात उमेदवारी देताना त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांना बाजूच्या पर्ये

मतदारसंघातून उमेदवारी

दिली. येथे घराणेशाहीचा किंवा कर्तबगारीचा प्रश्न भाजपच्या धुरिणांना पडला नाही. पण उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत तो प्रश्न पडला, ही बाब बरोबर नाही. कोणाला कोठे उमेदवाऱया द्याव्यात हा त्या त्या पक्षांचा अंतर्गत विषय आहे, पण पर्रीकरांच्या बाबतीत घराणेशाहीचा विषय निघाला म्हणून विषयांतर केले. उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादवांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना भाजपने प्रवेश दिला व लगेच उमेदवारी बहाल केली. ही घराणेशाहीच नाही काय? दुसऱया पक्षातील घराणेशाही वाजत गाजत पालखीत बसवायची व मनोहर पर्रीकरांच्या पुत्राच्या बाबतीत कर्तबगारी, घराणेशाहीची मोजपट्टी लावायची हा विनोद आहे. गोव्यात सध्या अशा विनोदाच्या फुलबाज्या उडत आहेत. प्रश्न फक्त भारतीय जनता पक्षाचाच नाही, तर अन्य राजकीय पक्षांनीही स्वतःचा चेहरा स्वच्छ आरशात पाहण्याची हीच वेळ आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून गेलेले अनेक आमदार पुन्हा बाहेर पडले आहेत. एक आमदार रेजिनाल्ड यांनी तर तृणमूलमध्ये आपण कसे गुदमरलेल्या अवस्थेत दिवस काढले ते जाहीर केले आहे. केजरीवाल यांनी सध्या पणजीतच मुक्काम ठोकला आहे व काँग्रेस पक्षाचे जहाज नक्की कोणत्या दिशेने चालले आहे ते कप्तानालाही माहीत नसावे. गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोयंकर जनतेलाच रोखावा लागेल. काँग्रेसने शहाणपणा दाखवला असता तर महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग करता आला असता व तो यशस्वी झाला असता; पण काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला आहे की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली आहे व साधारण वीसेक जागांवर त्यांचे उमेदवार लढत आहेत. हे खरे असले तरी

विरोधकांच्या विस्कळीतपणाचा

फायदा भाजपला होईल काय? हा प्रश्न आहेच. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची ‘मोट’ बनला आहे. हिंदुत्ववादी वगैरे विचार त्यांच्याकडे राहिलेला नाही. जो येईल त्याला पंगतीत बसवायचे व काम साधले की भरल्या पंगतीवरून उठवायचे हेच त्यांचे धोरण झाले आहे. त्यामुळे गोव्यातील भाजपमध्ये अशा भोजनभाऊंची गर्दी उसळते व पंगत सुरू असतानाच हे भोजनभाऊ दुसऱयांच्या पंगतीत सामील होतात, असे चित्र नेहमीचे झाले आहे. ना विचार ना भूमिका. ज्यांच्यावर अमली पदार्थांच्या व्यापाराचे आरोप व गुन्हे आहेत अशी ‘चारित्र्यवान’, ‘उद्योगी’ माणसे त्यांच्या भोजनावळीत बसली आहेत, पण उत्पल पर्रीकराचे ‘मेरिट’ म्हणजे लायकी काय? असा प्रश्न विचारला जात आहे! मिलिंद नाईक या मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले, पण त्यांनाही मुरगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. सावित्री कवळेकर यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याही बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून काँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. ‘गोव्यात काँग्रेसला मत म्हणजेच भाजपला मत’, असा नारा तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी दिला आहे. तो लोकांनी स्वीकारला तर काँग्रेसचे हसे होईल. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कोणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे? उत्पल जिद्दीने मैदानात उतरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील. पण त्यांची लढाई भाजपच्या बेइमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नये!