खोटे आरोप, स्टंटबाजी करणाऱ्या भाजपला शिवसेनेचा दणका! ‘स्थायी’त बोलायला देत नसल्याच्या आरोपाची पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आपल्या पक्षाच्या सदस्यांना बोलायला दिले जात नसल्याचे सांगत सभात्याग करून ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपला आज शिवसेनेने चांगलाच दणका दिला. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या 15 बैठकांमध्ये भाजपच्या सदस्यांना सर्वाधिक बोलायला दिल्याचे लेखी पुरावेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सादर केले. आंदोलनाची स्टंटबाजी हे केवळ भाजपचे नाहक राजकारण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून गोंधळ घालणाऱ्या भाजप नगरसेवकांना शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार घोषणा देत प्रत्युत्तर दिले.

पालिकेची स्थायी समितीची बैठक आज ऑनलाईनरीत्या सुरू झाली. या वेळी विषय पुकारल्यानंतर नियमानुसार बोलण्याची परवानगी मागणाऱ्या प्रत्येकाला बोलण्याची परवानगी देण्यात आली. मात्र प्रस्ताव क्र. 51चा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बोलायला दिले जात नसल्याचे सांगत भाजप सदस्यांनी सभात्याग केल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. याच सभेत भाजपच्या सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार बोलायला दिलेल्या सर्व विषयांची यादीच पत्रकार परिषदेत सादर केली. स्थायी समिती अध्यक्षांनी स्वतः ठिय्या मारलेल्या भाजप सदस्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमार्फत उपनगरातील सहा जंक्शनना नवी झळाळी मिळणार आहे. जुहू, जोगेश्वरी, कांदिवली (2), मुलुंड आणि अंधेरीच्या अशा जंक्शनचे अद्ययावतीकरण पालिका करणार असून त्यासाठीच्या 35 कोटी 90 लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा निधी पालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून दिला जाणार आहे. तसे हमीपत्रही पालिकेला मिळाले आहे.

शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी पालिका दुमदुमली

भाजपच्या सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या घोषणा देत गोंधळ घातला. मात्र शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना झिंदाबादच्या गगनभेदी घोषणा देत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले.  यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका सुजाता पाटेकर, राजूल पटेल, अरुंधती दुधवडकर, चंद्रशेखर वायंगणकर, विजयेंद्र शिंदे, सुरेश पाटील उपस्थित होते.

22 वर्षे झोपा काढत होता का!

2019मध्ये राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर भाजपने शिवसेनेवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमधील एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे भाजपचे आरोप म्हणजे शिवसेनेच्या बदनामीसाठी सुरू असलेले राजकारण असल्याचा टोला यशवंत जाधव यांनी लगावला.

कोविड काळात गर्दी आणि दाटीवाटीच्या मुंबईत कोरोनाला रोखण्यात पालिकेने यश मिळवले. त्यावरही भाजपने आक्षेप घेत भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे दक्षता विभागाकडून चौकशी केल्यानंतर एकही आरोप सिद्ध झालेला नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. पालिकेच्या कारभारात भाजप आमदार लुडबूड करीत असल्याने त्यांचे नगरसेवक अकार्यक्षम आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

भाजप मागील काही वर्षांत 22 वर्षे शिवसेनेसोबत सत्तेत होता. त्या वेळी कोणतेही आरोप झाले नाहीत. तेव्हा झोपा काढत होता का, असा टोलाही त्यांनी लगावला. विकासकामांचे प्रस्ताव हे पालिका प्रशासन मंजुरीसाठी मांडत असते, त्यावरून शिवसेनेवर नाहक आरोप का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.