संगीत रंगभूमीचे ‘शिलेदार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दीप्ती भोगले

‘संगीत नाटक’ या परफॉर्मिंग आर्टचं संगोपन या एकमेव उद्देशानं स्थापन झालेली आणि गेली 73 वर्षे अव्याहत कार्यरत असलेली संस्था म्हणजे ‘मराठी रंगभूमी, पुणे’. केवळ संगीतालाच वाहून घेतलेल्या संस्थेची वाटचाल सुरूच आहे.

ध्रुव ताऱ्याप्रमाणे बालगंधर्वांसारखी माणसंही एकदाच निर्माण होतात. त्यांच्या प्रकाशात माझे आजोबा नारायणराव जाधव, वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार या तिघांनी दि. 1 ऑक्टोबर 1949 रोजी केवळ संगीतालाच वाहून घेतलेली ‘मराठी रंगभूमी, पुणे’ ही संस्था स्थापन केली. पुण्याचे शुभारंभाचे प्रयोग करून कंपनी नाशिक मुक्कामी गेली. तिथून भालचंद्र पेंढारकर, अंकबुवा करंदीकर, बाळ कोल्हटकर संस्थेत दाखल झाले. प्रयोग देखणे, नीटनेटके करण्याकडे त्यांचा कल असायचा. प्रथम प्रयोगाचा बोर्ड लागला. ‘भानुविलास थिएटर’ 1 ऑक्टोबर 1949 रात्री 9 ।। वाजता. अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत ‘सौभद्र’ प्रमुख भूमिका जयराम शिलेदार, प्रमिला जाधव, अनंतराव वर्तक, गोपीनाथ सावकार, वसंतराव सावकार. प्रयोग हाऊसफुल्ल होता. उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिएटरमध्ये सोडताना जयराम शिलेदार त्यांच्या हातात श्रीफळ (नारळ) देऊन नमस्कार करून स्वागत करत होते. रसिकांचे आशीर्वाद अजूनही संस्थेला तारक आहेत.

महागाईला सुरुवात झाली होती. बहुतेक थिएटरांचा कब्जा सिनेमानं घेतला होता. त्यामुळे नाटकासाठी या सिनेमा थिएटरांची भाडी वाढत चालली. सिनेमाच्या शोसाठी नाट्यप्रयोगाला वेळेचं बंधन सुरू झालं. एकेका गावी कमीत कमी पंधरा दिवस तरी मुक्काम असायचा. नाटकासाठी सिनेमाचं थिएटर परवडत नव्हतं. वडिलांनी अर्ध्या कापडी थिएटरचा प्रयोग करून बघितलं. त्यानंतर पूर्ण कापडी थिएटर करायचं ठरवलं. अहमदपूरला संपूर्ण कापडी थिएटर घातलं. ‘40 बाय 100’च्या थिएटरला लागणारे कापड, थिएटरसाठी दरवाजाचे पडदे, थिएटरच्या समोरच्या बाजूला 8 बाय 100 चा व्हरांडा आणि तिकीट ऑफिससाठी लागणारं कापड, इतकंच काय 40 बाय 100 फूट थिएटरला लागणाऱया छताचं कापड अशा या थिएटरची किंमत आजमितीला साठ हजारांपर्यंत सहज झाली असती. हे ‘जयराम नाट्य मंदिर’ उभं करण्याची पद्धत थोडीशी सर्कसच्या धर्तीवर होती. ऑक्टोबर ते फेब्रुवारी कापडी थिएटर असायचे. बाकीचे महिने बंदिस्त थिएटरमध्ये प्रयोग करायचे. पुढल्या मुक्कामाला 15/20 दिवसआधी माणूस पाठवून थिएटरसाठी जागा निवडायची. खुर्च्यांसाठी खड्डा खणून ती माती स्टेज आणि ओटा म्हणजे खुर्च्यांच्या मागची पीट यासाठी रचली जायची. पडदे बांधण्यासाठी स्टेजवर मंडपी बांधायला लागायची. बंडपी म्हणजे बांबूची जाळी. त्यावर पडदे बांधण्यासाठी गडी माणसांना वावरणं शक्य व्हायचं. स्टेजच्या चौकटीत बल्ल्या बांधून झाले की, साधारण 16 फूट अंतरावर त्या चौकटीवर उभे आडवे बास बांधून बांबूची जाळी तयार व्हायची. दोन्ही बाजूला पडद्यांच्या दोऱ्या बांधायचा. प्रथम ड्रॉप (मुख्य पडदा), मग कव्हर पडदा (सर्वसाधारण वापरासाठी एकरंगी पडदा), मग महाल, जंगल असे सीनप्रमाणे पडदे बांधले जात. थिएटर झाकताना दरवाजाची जागा सोडून 8 फूट उंचीवर निळे कापड बांधायचे. नंतर 6 फूट उंच लाल पांढरी झालर बांधायची. थिएटरची जागा बंदिस्त केल्यावर नंतर छत बांधले जायचे. थिएटरभोवती कापडी कंपाऊंड असायचे. रंगपट, कपडे बदलण्याच्या खोल्या असायच्या. बिऱहाडी स्वरूपाची अशी आमची ही शेवटची कंपनी असावी.

संस्थेचं बिऱ्हाडी स्वरूप असं होतं. नवीन मुक्कामाच्या जागी गेल्यावर सर्व कंपनीसाठी एखादं घर भाड्यानं मिळवत असत. दूध, वाणसामान इ. खरेदी करून कंपनीतला आचारी बाळकोबा आणि वाढपी भगवान देशपांडे स्वयंपाकाच्या तयारीला लागत. रोज सकाळ-संध्याकाळ 50 माणसांचा स्वयंपाक होई. रात्री नाटकाचा एक अंक झाला की, बाळकोबा स्वयंपाक करायला निघायचा. आमटी, भात, भाजी, भाकरी असं साधंसंच जेवण, पण रात्रीचं नाटक झाल्यावर गरम गरम जेवण पुढ्यात आल्यावर नटाचा आनंद कसा खुलतो हे नटालाच कळू शकेल. सर्व नटांना एकत्र सूचना मिळण्यासाठी घंटानादा व्हायचा. चहा, जेवण, तालीम असा तीन-चार वेळा हा घंटानाद व्हायचा. नटांनी यासाठी इरसाल नावं ठेवली होती. चहाची घंटा म्हणजे अमृत घंटा, जेवणाची घंटा म्हणजे पुख्खा घंटा आणि तालमीची घंटा म्हणजे यमघंटा. संध्याकाळी पंचपटी (आरती) म्हणायची पद्धत सर्व नाटक कंपन्यांत असायची. तालमीच्या हॉलमध्ये नटराजाची मूती आणि किर्लोस्कर पंचायतनाच्या फोटो असलेल्या गादीसमोर ही आरती चालायची. कंपनीत 10 ते 12 कुटुंबे होती. दसरा- दिवाळी हे सण जोरदार साजरे होत.

मुक्काम बदलताना स्पेशल बस करत. प्रवासाला निघताना बटाट्याचा दाट रस्सा आणि पुऱ्या तयार करून मोठ्या किटल्यांमधून जेवण भरायचं. पुढच्या मुक्कामाला पोहोचलं की लगेच जेवून नटमंडळी विश्रांतीसाठी तयार होत. गावात कसली साथ असली तर गावातला डॉक्टर बोलावून प्रत्येक जण इंजेक्शन टोचून घ्यायचा. कोणत्याही गावी गेलं की धोबी, न्हावी, शिंपी, गडी सर्वांना महिनाभर काम मिळायचं. जाहिरातीसाठी टांग्यावर दोन बाजूंना दोन बोर्डस लावून कंपनीतला माणूस सकाळी आणि संध्याकाळी दोन-दोन तास लाऊडस्पीकरवर जाहिरात करत. रोजचा खर्च 25 रु. होता. 1 आण्याला 2, मोठे बटाटे वडे मिळायचे. कंपनीतल्या माणसांचा महिन्याभराचा पगार साधारणपणे 2 हजार रुपयांपर्यंत जायचा. भोजन खर्च महिन्याला सहाशे-सातशे, घरभाडे दीडशे रुपये नाटकांना हाऊसफुल्ल गर्दी होत राहिली तर उत्पन्नाचं प्रमाण बाराशे ते 1500 रुपये व्हायचं, पण एकूणच नाट्यसृष्टीसाठी पडताकाळ असल्याने ओढगस्तीची पाळी यायची. मग कर्ज काढावे लागे. नाटकाचा तिकीट दर 5, 3, 2, 1 रुपये आणि शेवटचा दर 50 पैसे असायचा. दर चार-पाच महिन्यांनी नवीन नाटक काढलं जाई.

रात्री 8।।च्या सुमाराला साथीची वाद्य लावून झाली की स्टेजवर पडद्याची पूजा व्हायची. बिसन पडद्याजवळ कुंकवान स्वस्तीक रेखून त्यावर फूल वाहून ड्रॉपला हार घालायचा. नारळ वाढवून धूप दाखवायचा. सर्व नटवर्गाला प्रसाद देऊन तिसरी घंटा व्हायची. बरोबर 9।। वाजता नाटकाला सुरुवात व्हायची. ती नांदीने
।।नमुनि ईशचरणा।।

[email protected]