
>> प्रशांत कुलकर्णी
यशवंत सरदेसाई हे मराठीतील एक अग्रगण्य हास्यचित्रकार आहेत. उत्तम विनोद बुद्धीचे वरदान त्यांना लाभले असल्याने सूक्ष्म निरीक्षण शक्तीच्या सहाय्याने ते दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांकडे पाहतात आणि त्यातील नेमकी विसंगती शोधून अतिशयोक्तीच्या सहाय्याने हास्यस्फोटक किंवा मिश्कील हास्यचित्र रेखाटतात. सरदेसाई यांनी दैनिकांमध्ये रेखाटलेली पॉकेट कार्टून्स वाचकांच्या भेटीला यावीत यासाठी शर्वा प्रकाशनचे प्रकाशक चंद्रशेखर दाभोळकर यांनी ती पुस्तक स्वरूपात ‘निवडक हास्यार्थ’ या नावाने प्रसिद्ध केली आहेत.
सरदेसाई यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ते रुढार्थाने दैनंदिन विषय हाताळत नाहीत, तर त्यातील थोड्या वेगळ्या विषयांना ते हात घालतात. काही वर्षांपूर्वी दैनिकात सरदेसाई यांची ‘हास्यार्थ’ या नावाने पॉकेट कार्टून्स असायची. त्यातील अनेक चित्रांची आवर्जून दखल घ्यावी अशीच ती आहेत. गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन अनेक भामटे समाजात वावरत असतात. यातील मध्यंतरीच्या काळात गाजलेली एक योजना म्हणजे तुम्ही वृक्षांची लागवड करा आणि वीस वर्षांनंतर तुम्हाला प्रचंड रक्कम मिळेल वगैरे वगैरे. त्यावरचे सरदेसाई यांचे व्यंगचित्र अफलातून आहे. अशा या वृक्षलागवड योजनेवरचं व्याज म्हणून गुंतवणूकदारांना एक छोटेसे रोपटे मिळते असा त्याचा आशय आहे. कर वाचवण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराची फी देऊन कफल्लक झालेला पीडित गुंतवणूकदारही त्यांनी झक्कास रेखाटला आहे. सुपर मार्केटमधील मेगा सेल, तेलाचे भडकणारे भाव, महागाई, काळाबाजार, शेअर बाजार इत्यादी अर्थशास्त्रातील विषय त्यांनी नेमकेपणाने हाताळले आहेत. ती सर्व कार्टून्स ‘हास्यार्थ’ पुस्तकात वाचकांच्या भेटीला आली आहेत.
ब्रशच्या भानगडीत न पडता ते साध्या पेनाने चित्र रेखाटतात आणि आवश्यक तेवढे तपशील चितारतात. त्यांचा भर हा चित्रातल्या पात्रांच्या भावनांवर अधिक असतो. त्यामुळे साहजिकच त्यांची चित्रे एक्प्रेसिव्ह होतात. वेगवेगळे विषय, वेगळ्या प्रकारचा विनोद आणि वेगळी स्वतंत्र शैली यामुळे त्यांची कार्टून्स रसिकांना भावली आहेत. व्यंगचित्रकाराची चित्रं रसिकांना दीर्घकाळ आवडण्यासाठी उत्तम दर्जाचा विनोद हा दीर्घकाळ सुचावा लागतो. त्याबाबतीत सरदेसाई हे मराठीतील हास्यचित्रकलेतील यशवंतच आहेत. चंद्रशेखर दाभोळकरांनी ही सर्व हास्यचित्रे पुस्तक स्वरूपात आणून एका पिढीच्या आठवणी तरोताजा केल्या आहेत.
निवडक हास्यार्थ
लेखक : यशवंत सरदेसाई
प्रकाशक : शर्वा प्रकाशन
मूल्य : रुपये 150/-




























































