
>> उत्तरा मोने
दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केला जातो. यानिमित्ताने मराठी साहित्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स या संस्थांतर्फे ‘साहित्यसेतू’ या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
मराठी भाषेची समृद्धी साजरी करण्यासाठी, मराठी भाषेचा महिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित केला जातो. यानिमित्ताने मराठी साहित्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स या संस्थांतर्फे ‘साहित्यसेतू’ या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
14 ते 28 जानेवारी 2022 या कालखंडात दररोज संध्याकाळी 4 वाजता राज्य मराठी विकास संस्था तसंच मिती ग्रुप या फेसबुक पेजेसवरून आणि यूट्यूब चॅनलवरून हे कार्यक्रम प्रदर्शित केले जात आहेत. विविध साहित्य प्रकारांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होतच असतात, म्हणूनच या कार्यक्रमांच्या माध्यमातून या वर्षी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी साहित्यातील निवडक कलाकृतींचा डिजिटल वाचन कट्टा यानिमित्ताने तयार होत आहे. कार्यक्रमात कथा, कादंबरी, नाटक, विनोदी साहित्य, विज्ञानवादी साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. या प्रत्येक साहित्य प्रकारातील काही निवडक कलाकृतीचं वाचन कार्यक्रमात केलं जात आहे.
पंधरवड्यातील पहिल्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी त्यांनी आपलं मनोगतसुद्धा व्यक्त केलं. ते म्हणाले, राज्य सरकारच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत आणि आजही सुरू आहेत. याच अनुषंगाने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असणाऱया मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचं काम या फेब्रुवारी महिन्यात होईल. मराठी भाषेचं ऐश्वर्य या भवनामध्ये नक्कीच लक्षात येईल.
उद्घाटनानंतर अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे आणि मराठी भाषा समितीचे समन्वयक, प्रा. हरी नरके यांनी समितीच्या कामाचा थोडक्यात आढावा घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्यामुळे लोकांमध्ये या भाषा वापराबद्दल आत्मविश्वास वाढेल असं मत स्पष्ट केलं. यंदाचं हे वर्ष म्हणजे कविवर्य वसंत बापट यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारीला वसंत बापट यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना झेलम परांजपे, कवी दासू वैद्य आणि कवयित्री नीरजा यांनी आठवणींचा पट मांडत त्यांच्या साहित्यिक योगदानाची वाचकांना यावेळी ओळख करून दिली. 16 जानेवारी रोजी कथा हा साहित्य प्रकार प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. कार्यक्रमात लेखिका सानिया, लेखक प्रणव सखदेव, लेखक किरण येले यांनी वेगवेगळय़ा कथावाचनातून प्रेक्षकांना त्या त्या कथेतील पात्रांच्या भावविश्वाची खूप जवळून ओळख करून दिली. यापुढच्या कार्यक्रमात म्हणजेच 17 जानेवारीला कादंबरी या साहित्य प्रकाराचं वाचन केलं गेलं. कादंबरीचा काळ, कादंबरीची पार्श्वभूमी, त्यातली भाषा, पात्ररचना अशा वैविध्यपूर्ण लेखनातून कादंबरीकार शिल्पा कांबळे, कादंबरीकार कृष्णात खोत, कादंबरीकार ऋषीकेश गुप्ते यांनी वाचकांना जगण्याच्या विविध पैलूंची ओळख करून दिली. या वाचनातून प्रेक्षकांना या कादंबऱया वाचण्याची उत्सुकताही नक्कीच निर्माण झाली. 18 जानेवारी रोजी कवी व गीतकार किशोर कदम, कवी व गीतकार गुरू ठाकूर, कवयित्री कल्पना दुधाळ यांनी कवितेच्या माध्यमातून मानवी भावभावनांची अनुभूती प्रेक्षकांना करून दिली. नाटक या साहित्य प्रकाराशी प्रत्येक मराठी माणसाची नाळ जोडलेली आहे. म्हणूनच 19 जानेवारीला विविध नाटकांतील काही प्रवेश दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्राजक्त देशमुख आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांनी प्रेक्षकांसमोर मांडले. मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारा साहित्य प्रकार म्हणजे ललित लेखन. 20 जानेवारीला झालेल्या या कार्यक्रमात लेखिका राजेश्वरी किशोर, लेखिका, अनुवादक नीता कुलकर्णी, लेखक आशुतोष जावडेकर यांनी आपल्या वाचनातून प्रेक्षकांना भाषेची समृद्धी आणि साहित्याचं महत्त्व पटवून दिलं.
21 जानेवारी रोजी समाजातल्या विविध पैलूंचं कलात्मक दर्शन घडवणाऱ्या लोकसाहित्यातील काही दर्जेदार कलाकृतींचं सादरीकरण केलं लोकसाहित्य अभ्यासक, लेखिका, डॉ. तारा भवाळकर, लेखक, डॉ. मुकुंद कुळे यांनी. वाचकांना विविध ठिकाणांची सफर करून आणण्याची ताकद असते ती प्रवासवर्णनात. 22 जानेवारीला झालेल्या कार्यक्रमात लेखक आशीष काळकर, लेखक आदित्य दवणे यांनी सादर केलेल्या प्रवासवर्णनातून प्रेक्षकांनाही या सफरींची एक झलक अनुभवता आली. 23 जानेवारी रोजी सर्व चिंता विसरून वाचकांना काही विरंगुळ्याचे क्षण मिळवून देणाऱ्या विनोदी साहित्याचं सादरीकरण केलं जाईल. या कार्यक्रमात संपादक मुकेश माचकर, लेखिका सई लळित, लेखक मंदार भारदे आपल्या सदरीकरणातून प्रेक्षकांना हास्यनगरीची सैर करवून आणतील.
सलग पंधरा दिवस सुरू असणाऱ्या या डिजिटल कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्याचा गौरव तर होईलच, पण त्याचबरोबर डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने कार्यक्रम केल्याने आजच्या पिढीला या उत्तम वाङ्मय प्रकारांची ओळख होईल आणि सादरीकरणामुळे हे साहित्य वाचलंही जाईल. मराठी भाषेचा हा वाचनप्रवाह अबाधित ठेवण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना व्हर्च्युअल हजेरी लावत आहेत व यापुढेही असाच प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.


























































