
दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसैनिकांना दिली. भाजपचे हिंदुत्व वाघाचे कातडे पांघरलेल्या गाढव आणि शेळीसारखे असल्याचा आसूड ओढत काळजीवाहू विरोधकांना भगव्याचे तेज दाखवणार, अशी ‘जडीबुटी’च भाजपला दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा ठाकरी बाण भाजपच्या वर्मी बसला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्या जन्माआधी भाजपचे नगरसेवक, आमदार होते तसेच भाजपच हिंदुत्वाचा तारणहार असल्याचा दावा करत टीका केली. या त्यांच्या टिकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले तर राष्ट्रवादीचे प्रवत्ते नवाब मलिक यांनी भाजपने सेनेला संपवण्याचे राजकारण केले पण त्यांना शिवसेना काय हे कळले, असा टोला लगावला.
शिवसेनेच्या जन्माआधी भाजपचे नगरसेवक-आमदार
युतीत शिवसेनेची 25 वर्षे सडली या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, शिवसेना पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये शिवसेनेने लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती, असा दावा केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळाल्या. बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? भाजपसोबत सडले असं सांगतात, पण भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
रामजन्मभूमीसाठी आम्हीच प्रयत्न केले
रामजन्मभूमीसाठी आम्हीच प्रयत्न केले. रामजन्मभूमी आंदोलनात लाठय़ा, काठय़ा आणि गोळय़ा खाणारे आम्ही आहोत. मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर उभे राहत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा, श्रीमलंगगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करु शकले नाही; पण तिथे अलाहाबादचं प्रयागराज झालं, त्यांनी ते करून दाखवलं. हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदींनी ते करून दाखवलं आहे, अशी मल्लीनाथी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
…तेव्हा फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक टीकेचे सडेतोड उत्तर देताना, भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर फडणवीसांना दिला असता तर उत्तर देणे सोपे झाले असते असा टोला लगावला. भाजपचा जन्म 1980च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म 1966 सालचा हे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. या सगळय़ा गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा जोरदार चिमटा संजय राऊत यांनी काढला.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाचं प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, भाजपच्या जन्मतारखेचा दाखला त्यांनी आणला तर लोकांना कळेल भाजप कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला! शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद गुप्ते कधी झाले. त्या वेळी आमच्याकडे किती नगरसेवक होते यासंदर्भातील एखादं अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेवू आणि जर कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या. शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावात प्रमोद नवलकर आमचे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावातून आमचे छगन भुजबळ निवडून आले होते. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत.
मग कोर्ट मूर्ख होते का?
या वेळी त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या मुद्दय़ावरूनही भाजपवर हल्ला केला. कोणी काही म्हटलं तरी इतिहास, दस्तावेज रेकॉर्डस् आहेत. सीबीआय स्पेशल कोर्ट निर्माण झालं त्यासमोरचे साक्षीपुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी केलं होतं. आडवाणींबरोबर ठाकरे त्यातील एक आरोपी आहेत. मग कोर्ट मूर्ख होते का? शेकडो कारसेवक मुंबईतून गेले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता. अगदी विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे, सतीश प्रधान अनेक लोक आमचे इथून गेले होते. त्या काळातील ‘सामना’ पाहिला तर कोण कोण कुठून निघाले त्याची मॉनिटरिंग मुंबईतून होत होती. सेना भवनात त्या काळात वॉर रूम तयार झाली होती याची आठवण खासदार संजय राऊत यांनी करून दिली.
अयोध्येशी संबंध काय हे रामाला माहीत
आता कुणाला वेगळी माहिती द्यायची असेल, कितीही माहिती प्रसवली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. शिवसेनेचं योगदान ऐतिहासिक आहे. हा लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो आणि वातावरण तापवले. सरकारला जाग आली. अयोध्येशी आमचा संबंध काय हे रामाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होतात का?
संभाजीनगरच्या मुद्दय़ावरून खासदार संजय राऊत यांनी आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का, असा थेट सवाल फडणवीसांना केला. ते पुढे म्हणाले, आपण हिंदुत्ववादी म्हणून आमच्यासोबत पाच वर्षे मुख्यमंत्री होतात ना? एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागते. केंद्र सरकारने त्याला परवानगी द्यावी लागते आणि मागील काही वर्षांपासून सरकार त्यासाठी केंद्राकडे प्रयत्न करत आहे. केंद्राने त्याला मंजुरी का दिली नाही हे विचारावं लागेल. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आपल्याला असं का वाटलं नाही? जसं योगींनी प्रयागराज करून घेतलं, तसं फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही, हादेखील प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.
फडणवीस यांनी दिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण केले
दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता त्यांना समजले आहे; परंतु आठ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला.
पाच वर्षांचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे युतीत सडलो असे विधान केले आहे; मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरून भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीनी वाढलेला दिसला असेही नवाब मलिक म्हणाले.






























































