
‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख करून अभियंता महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर अभियंता तरुणाने बर्थ डे पार्टीला बोलावून बलात्कार केला.
निशांत हरीश चंदनानी (वय 34, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 32 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि निशांत हे दोघेही अभियंता असून, घटस्फोटित आहेत. दुसरे लग्न करण्यासाठी महिलेने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवर नावनोंदणी केली होती. त्या वेबसाइटवरून निशांतने पीडित महिलेसोबत ओळख केली. ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याच्या वाढदिवसानिमित्त भूमकर चौकातील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थ डे पार्टीसाठी महिलेला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. ‘तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, उद्या सकाळी जा’, असे म्हणून निशांतने तिला घरी थांबवून घेतले. त्यानंतर महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
घरात घुसून महिलेचा विनयभंग
घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री हिंजवडी येथे घडली. समीर श्रीरंग जाधव (रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 27वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी समीर हा महिलेच्या घरात आला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. फौजदार रवींद्र मूदळ तपास करत आहेत.
तरुणीचा विनयभंग करणारा आरोपी गजाआड
मैत्री करून शारीरिक संबंध ठेव; अन्यथा फोटो सोशल मीडियावर टाकेन, अशी धमकी देऊन महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 23) भाजी मार्केटजवळ म्हाळुगे येथे घडली. नूर पीर मोहम्मद (वय 23, रा. वरळे रोड, म्हाळंगे, मूळ – लोटाढ, ता. मेजारोड, जि. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी नूर याने तरुणीच्या घरी जाऊन ‘माझ्याशी मैत्री कर आणि शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन’, अशी धमकी दिली. तसेच, तिचा हात पकडून विनयभंग केला.
पोलीस तक्रार केल्याने तरुणीचा विनयभंग
पोलीस तक्रार केल्याच्या कारणावरून तरुणीला व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, तरुणीचा विनयभंग केला. आदर्शनगर-भोसरी येथे सोमवारी (दि. 24) ही घटना घडली. आदित्य भालशंकर (वय 23, रा. भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित 18 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीने यापूर्वी आरोपी आदित्यच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्या कारणावरून आदित्यने फिर्यादी तरुणी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादी तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.



























































