पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा 1 फेब्रुवारीला जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रभाग रचनेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा मंगळवारी 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध केला जाणार आहे. या आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी तसेच सूचना करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या हरकतींवर 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.

प्रभागाची सरासरी लोकसंख्या 61 हजार

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेसाठी 173 जागांसाठी जाहीर केलेल्या 58 प्रभागांपैकी 57 प्रभाग हे त्रिसदस्यीय राहणार असून त्यामध्ये सर्वांत कमी लोकसंख्या असलेला प्रभाग 55 हजारांचा असेल तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग हा 66 हजारांचा असेल. तर एकमेव द्विसदस्यीय प्रभाग हा प्रभाग क्र. 13 हा राहणार असून त्याची मतदार संख्या 37 हजार 589 आहे. तीन सदस्यीय प्रभागाची सरासरी लोकसंख्या 61 हजार 669 च्या आसपास असेल. निवडणूक आयोगाने 2011 या वर्षाची जनगणना अर्थात 35 लाख 56 हजार 824 ही समोर ठेवून ही रचना केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात साधारण मतदार संख्या ही 56 हजारांच्या आसपास राहणार आहे.

प्रभागात कोणते आरक्षण असणार हे गुलदस्त्यात राहणार

58 प्रभागांमधील 173 जागांपैकी 23 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव असतील. त्यापैकी 12 जागा महिला व 11 जागा पुरुषांसाठी राखीव राहतील. तर अनुसूचित जमाती साठी 2 जागा राखीव असतील. पुरुष आणि महिला उमेदवारीसाठी प्रत्येकी एक जागा राहील. 173 जागांपैकी 50 टक्के आरक्षणानुसार 87 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यात 74 जागा खुल्या गटातील महिलांसाठी असणार आहेत. मात्र प्रभाग रचना अंतिम झाल्यावर आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार हे गुलदस्त्यात असेल.

प्रथमच महापालिकेत प्रशासक

महापालिकेची मुदत 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. सुरुवातीला प्रभागरचना केली जाणार असून त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, प्रभाग रचना मार्च मध्ये होणार असल्याने निवडणुका एप्रिल अखेर अथवा मे महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट आहे. तसेच 14 मार्च पासून महापालिकेत प्रशासकाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्व निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेची निवडणुक होईल असे चित्र आहे़

असा आहे आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम

मंगळवार 1 फेब्रुवारी – प्रारूप प्रभाग रचना हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणे.

सोमवार 14 फेब्रुवारी – हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख.

शनिवार 16 फेब्रुवारी – हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे.

बुधवार 26 फेब्रुवारी – हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्याची अंतिम तारीख.

बुधवार 2 मार्च – हरकती व सुचनांवरील सुनावणी नंतर विवरणपत्र शिफारशीसह निवडणूक आयोगाला सादर करणे.